Ahmednagar News : बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेसाठी पाणी उपलब्धतेचा दाखल देण्यात येऊन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच निधी वर्ग करण्यात यावा, अशी मागणी साकळाई कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
डॉ. सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी १६ एप्रिल २०१९ ला वाळकी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.

भाजपा शिंदे सेनेचे सरकार येताच खा. डॉ सुजय विखे यांनी साकळाई योजनेचा पाठपुरावा सुरू केला. साकळाई पाणी योजना ही श्रीगोंदा, नगर तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी आहे.
गेले ३५ वर्षांपासून योजनेची मागणी होत आहे. डॉ. सुजय विखे यांनी या कामी भाजपा- शिवसेना सरकार काळातही त्यांनी मुंबईत अनेक वेळा बैठका घेतल्या. पुन्हा भाजपाचे सरकार येताच खा. डॉ सुजय विखे यांनी पुन्हा जोरदार सक्रियता दाखवली.
उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे पाठपुरावा सुरू केला. उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, खा.डॉ सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, जलसंपदा सचिव, सचिव लाभ क्षेत्र विकास, मुख्य अभियंता कुकडी आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत साकळाई पाणी योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली. सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पाणी उपलब्धतेचा दाखल देण्यात येवून योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी.
तसेच निधी वर्ग करण्यात यावा अशी मागणी साकळाई कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. साकळाई योजनेसाठी खा. सुजय विखे पाटील, भाजपा नेते शिवाजीराव कर्डिले यांनी विशेष प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी साकळाई कृती समातीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, सभापती भाऊसाहेब बोठे, माजी सभापती अभिलाष घिगे पाटील, पुरुषोत्त लगड, माजी सरपंच सुरेश काटे, नारायण रोडे, डॉ. खाकाळ, संतोष मेहेत्रे, एन.डी. कासार, सोमनाथ धाडगे, केशव कोतकर आदी उपस्थित होते.