Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाल्यामुळे सकाळपासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी तर उन्हाची दाहकता जास्तच राहात आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. परिणामी पंखे, कुलर, एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. अजूनही यात वाढच होणार आहे.
मागणी व पुरवठा कमीअधिक झाल्याने अगामी काळात महावितरणकडून ग्रामीण शहरी भागात लोडशेडिंग वाढण्याची चिन्हे आहेत.
यंदा उन्हाळा कडक असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. यंदा भूजल पातळी खालावण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी विहिरींचे पाणी संपले आहे. परिणामी पिकांना द्यायला पाणी नाही. शेतात पाणी न फिरल्यामुळे उष्मा कमी होण्यासाठी मदत होत नाही.
परिणामी ऊन जास्त जानवत आहे. साहजिकच उन्हापासून दिलासा मिळावा, म्हणून पंखे, कुलर, एसी चालवावे लागतात. यासाठी अतिरीक्त वीज लागते. मात्र महावितरण आधीच वीजेबाबत तुटीत आहे. ही तूट भरून निघण्याची चिन्हेही नाहीत.
त्यामुळे भारनियमन करावे लागणार आहे, किंबहुना त्याची सुरुवातही करण्यात आली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसणार आहे.
ग्रामीण भागात दिवसा तसेच रात्री बेरात्री, पहाटे कधीही अनेक वेळा वीजपुरवठा बंद होत आहे. चौकशी केली असता दुरुस्ती सुरू असल्याचे कारण दिले जात आहे; मात्र वास्तविक वीज पुरवठ्याची तूट भरून काढण्यासाठी हे उपाय योजले जात आहे.
येत्या काही दिवसांत वीजेची मागणी आणखी वाढणार असून परिणामी भारनियमनही अधिक वेळा केले जाण्याची शक्यता आहे.