Ahmednagar News : लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:
Love Jihad

Ahmednagar News : उंबरे (ता. राहुरी) येथे धार्मिक स्थळावर हल्ला करणारे व लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. सोमवारी (दि. ३१) मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर जिल्ह्यात विविध घटनांमध्ये मुस्लिम समाज व त्यांच्या धार्मिक स्थळांना टारगेट केले जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी, माजी नगरसेवक सादिक जहागीरदार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार, हाजी वहाब सय्यद, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सय्यद साबिर अली, सय्यद मुजाहिद, अमीर सय्यद, खालिद शेख, तन्वीर शेख, आबिद दुल्हेखान, शाहनवाज शेख, शाकिर शेख, जाबिर शेख, मोईन सय्यद, अयनुल शेख आदी उपस्थित होते.

राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात एका गटाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला चढविला व पवित्र ग्रंथाचा अवमान केला. या घटनेस थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा हात मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.\

या घटनेची तक्रार संबंधित फिर्यादीने दिली व पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु हल्ला करणाऱ्या गटांनी या गुन्ह्याला बगल देण्यासाठी खोटा लव्ह जिहाद व धर्मांतरणाचा प्रयत्न याचा गुन्हा दाखल करून निष्पाप लोकांना यामध्ये गोवले. यात महिला व फिर्यादी यांनाच आरोपी ठरविण्यात आले आहे.

ही कृती अत्यंत निंदनीय असून, पोलीस यंत्रणेने घटनेची सत्यता पडताळून अटक सत्र करण्यात येणे अपेक्षित आहे, परंतु तसे घडले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. उंबरे प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करावी, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी व दोन धर्मामध्ये वारंवार द्वेष पसरविणाऱ्या समाजकंटकांवर व संघटनावर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe