निळवंडे लाभक्षेत्रातील पाणीपट्टी कमी करण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील डोंगराळ तसेच खडकाळ भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या पिंपळगाव नाकविंदा तसेच शेरणखेल येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली, तसेच निळवंडे लाभक्षेत्रातील वाढवलेली पाणीपट्टी पूर्वीप्रमाणेच कमी करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले, की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे; परंतु अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पाण्याची कमतरता, हवामानातील बदल, शेतीमालाला हमीभाव नसणे, खते, बियाणे, औषधे यांचे वाढते दर, निर्यात बंदी,

सरकारी धोरण यांमुळे अर्थव्यवस्थेचा कणा नेहमीच ताठ राहण्याऐवजी मोडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. त्यातच वाढत जाणारी पाणीपट्टीची समस्या सतत भेडसावत आहे.

म्हणजेच दुष्काळात तेरावा महीना म्हणावा लागेल. म्हणूनच अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा व शेरणखेल येथील निळवंडे धरण लाभक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी तथा माजी सरपंच भाऊसाहेब कासार, वाळीबा लगड, पोलीस पाटील चंद्रकांत लगड, संदिप आभाळे, नवनाथ लगड, संतोष लगड, भिमराव सदगिर, खंडू लगड आदी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाणीपट्टी पुर्वीच्या दराने आकारावी, यासाठी मंत्री विखे पाटील यांची लोणी येथे भेट घेऊन चर्चा केली तसेच निवेदन दिले.

आधिच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे. निळवंडे जलाशयातील पाणीपट्टी आहे त्या पाणीपट्टीत २० पटींनी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठा आन्याय झाला आहे. हा झालेला अन्याय दूर करून त्यात लक्ष घालून न्याय द्यावा.

योग्य ती पाणीपट्टी आकारण्यात यावी. पुर्वीची पाणीपट्टी भरण्यास सर्व शेतकरी तयार असून सध्याची विस पटीने वाढलेली पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीची पाणीपट्टी मिळावी. संबंधीत विभागास योग्य ती कार्यवाही करण्यास आदेश दयावेत अशी विनंती केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe