अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, उपाध्यक्ष निलेश उबाळे, सचिव विनोद पंडित, रतन तुपविहीरे, एस.आर. सोनवणे, संजय भिंगारदिवे, गणेश कवडे, ए.एस. जाधव, अतुल थोरात, संजय रायकवाड आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.
महासंघाचे राज्य अध्यक्ष एस.आर. भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी भेट घेऊन पदोन्नतीसह इतर इतर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह संयुक्त बैठक घेण्याचे सांगितले आहे. बहुजन अधिकारी कर्मचारी यांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबीत आहे. ते तातडीने सोडविण्यासाठी संघटना कटिबध्द असून, शासन स्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून खुल्या प्रवर्गा बरोबर मागासवर्गीय कर्मचार्यांना सुद्धा पदोन्नती देण्यात यावी, नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कामगारांची ठेका पद्धत रद्द करून त्यांना राज्य शासनाने वेतन द्यावे आणि तीन वर्षांच्या सेवेनंतर त्यांना त्याच खात्यात कायम करण्यात यावे, शासकीय,
निमशासकीय कार्यालयातील सध्या रिक्त असलेली सर्व पदे त्वरित भरण्यात यावी, सेवाभरती नियमात सुधारणा करण्यात याव्या, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांना पुन्हा करार पद्धतीने कामावर न घेता सुशिक्षित बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे, प्रत्येक कार्यालयात मागासवर्गीय कर्मचार्यांची तक्रार निवारण समिती स्थापन करावी, विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना शंभर टक्के शासकीय अनुदान देण्यात यावे,
भूविकास बँकेची संपूर्ण मालमत्ता राज्य शासनाने स्वतःच्या ताब्यात घ्यावी व तेथील कर्मचार्यांना संपूर्ण देणी देण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वेतन पडताळणी पथक स्थापन करण्यात यावे, गुणवत्तेनुसार निवड झालेल्या मागासवर्गीय जातीच्या उमेदवारांची खुल्या प्रवर्गात गणना करण्याची मागणी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved