Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी २२ / २३ गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम दसरा – दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे.
यासंदर्भात साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातून २२/२३ गळीत हंगामात गाळप झालेला ऊसला अहमदनगर जिल्ह्यातील अनेक कारखाने जास्तीत जास्त दर देत आहेत,
परंतु शेवगाव व परिसरातील कारखाने मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर ऊस उत्पादक शेतकरी कमी ऊस दर देणाऱ्या कारखान्याला ऊस देणार नाहीत, कारण यावर्षी उसाला खर्च जास्त करून उत्पादन कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे,
तसेच साखरेला देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळत आहे, इतर उपपदार्थांनाही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त दर देणे कारखान्यांना शक्य आहे, तसेच शेवगाव तालुका व परिसरातील कारखान्यांनी उपपदार्थापासून मिळणारा नफा आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेला नाही,
यावर्षी पावसाचा पडलेला मोठा खंड लक्षात घेऊन रिकव्हरीमध्ये झालेली मोठी घट लक्षात घेत कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहावे. दसरा दिवाळीला दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देऊन फुंदे यांनी जो जास्त ऊसदर देईल त्याच कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.