अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील अचानकवाडी भागातील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली. ही घटना काल (दि.७ एप्रिल) दुपारनंतर उघडकीस आली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.
अधिक माहिती अशी : सारोळा बद्दी येथील अचानक वाडी भागातील हनुमान मंदिरातील मूर्तीवर अज्ञात समाज कंटकांनी हिरवा गुलाल टाकत मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. हे मंदिर लोक वस्तीपासून काही अंतरावर आहे.

दुपारी चारच्या सुमारास काही गावकऱ्यांच्या ही घटना लक्षात आली. ही बातमी गावात पसरताच गावकरी त्या ठिकाणी गोळा झाले. गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला. मोठी घोषणाबाजी याठिकाणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी नागरिकांनी काही काल रास्तारोको आंदोलन केले.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. आरोपींचा तातडीने शोध घेत अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर नागरिकांनी रास्तारोको मागे घेतला. दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले. हा आरोपी एक मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान याबाबत माहिती सांगताना प्रल्हाद गीते, एपीआय, नगर तालुका पोलीस ठाणे यांनी म्हटले की, एक इसम दोन तीन दिवसांपासून सदर परिसरात फिरत होता. मंदिरात विविध रंगाच्या रांगोळ्या होत्या. सदर इसमाने या रांगोळ्या एकत्र केल्या, त्यामुळे त्यास हिरवट रंग आला. त्याने ते मूर्तीवर टाकले.
तसेच तेथे असणारे अगरबत्ती कापूर पेटवून दिले. त्यामुळे तेथील फरशी काळवंडून फुटली. दरम्यान, या इसमाला गावातीलच काही इसमांनी पाहिले असल्याने त्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. हा आरोपी मनोरुग्ण आहे. त्यामुळे हा प्रकार एका मनोरुग्ण इसमाने केला आहे. त्यास ताब्यात घेतले आहे. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले.