शनी अमावास्येला भक्तांनी शनी चरणी केले सव्वा कोटींचे दान, देवस्थानला बर्फी विक्रीतून मिळाले ४४ लाख रूपये

Published on -

शनिशिंगणापूर- शनिवारी (२९ मार्च) शनी अमावास्या आणि शनिपालट योग एकाच दिवशी आल्याने राज्यभरातून लाखो भाविकांनी शनी दर्शनासाठी गर्दी केली. शनिदेवाला अभिषेक, पूजन आणि तेल अर्पण करताना भाविकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली.

भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान देत शनी चरणी तब्बल १ कोटी २६ लाख ३१ हजार ६६२ रुपयांची रक्कम अर्पण केली.

शनिवारी रात्रीपर्यंत झालेल्या दानाची देवस्थानतर्फे माहिती देण्यात आली. रोख स्वरूपात ११ लाख ७८ हजार ८०२ रुपये आणि देणगी पेटीतून ९ लाख ६८ हजार ८४६ रुपये जमा झाले. ऑनलाइन देणगीद्वारे ८ लाख ९० हजार ३४८ रुपये मिळाले. याशिवाय, तेल विक्रीतून ११ लाख ६५ हजार ४६० रुपयांचे उत्पन्न झाले.

यंदा विशेष म्हणजे देवस्थानच्या बर्फी विक्रीतून तब्बल ४४ लाख ४९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. शनी अमावास्येनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून देवस्थानकडील बर्फीला मोठी मागणी असते. त्यामुळे यंदाही बर्फी विक्रीतून विक्रमी उत्पन्न मिळाल्याचे दिसून आले.

मंदिरातील दानपेट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली. साप्ताहिक दानपेटीतील उत्पन्न ३० लाख ४६ हजार ७१६ रुपये होते. तसेच, भाविकांनी सोन्या-चांदीच्या रूपातही भरघोस देणगी दिली. एकूण ९ लाख ३२ हजार ४९० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दान मिळाले. विशेष म्हणजे, एका भाविकाने १० तोळे सोने दान करून श्रद्धेचा अनोखा आदर्श ठेवला.

शनी अमावास्येनिमित्त देशभरातून लाखो भक्त शनिशिंगणापुरात दाखल झाले होते. शनिदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देवस्थान व्यवस्थापनाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे. भाविकांनी अर्पण केलेल्या या भरघोस दानामुळे देवस्थानच्या विविध सेवा-सुविधांमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News