अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरणातून दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसर्ग सुरु केल्याने भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरण्यास विलंब लागणार आहे. धरणाच्या सांडव्यातून १०९० तसेच विजनिर्माण केंद्रातून ८२५ क्युसेसने पाणी प्रवरा नदीत वाहत आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाला गुरुवारी संध्याकाळपासून भरण्याचे वेध लागले आहेत. भंडारदरा धरण ९३ टक्के भरले असताना धरण शाखेकडून धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

त्यामुळे धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांना धरण भरण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दलघफु होताच धरण तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे जाहीर होत असते.

धरणाच्या इतिहासात धरण अनेकदा स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर भरत असते . याही वर्षी धरण स्वातंत्र्य दिनाला भरणार का ? हा प्रश्न अद्यापही पाणी सोडल्यामुळे गुलदस्त्यातच आहे. भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून १ हजार ९० दलघफु पाणी सोडण्यात आले असून विजनिर्माण केंद्रातून ८२५ क्युसेस विसर्ग सुरु आहे.

भंडारदरा पाणलोटात सोसाट्याच्या वा-यासह पाऊस मात्र सुरूच आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असून निळवंडे धरण ८१ टक्के भरले आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६ हजार ८१० दलघफु झाला असून धरणातून २४०० क्युसेसने विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे.

धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभक्षेत्रात फायदा होणार आहे. गत २४ तासामध्ये भंडारदरा येथे ५९ मीमी पाऊस पडला आहे. रतनवाडी येथे ७९ मी मी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचे माहेरघर समजल्या जाणा- या घाटघरला आत्तापर्यंत ३७७५ मीमी पाऊस कोसळला असून २४ तासामध्ये ७५ मी पावसाची नोंद झाली. वाकी येथे ४६ मी मी पाऊस पडला. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी संध्याकाळी १०, २६२ दलघफु झाला. धरण ९२.९८ टक्के भरले आहे. गत १२ तासामध्ये भंडारद-यात २३ मी मी पावसाची नोंद झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe