जिल्हा बँकेने नेहमीच आर्थिक शिस्त राखीत शेतकरी हिताचा कारभार केला – शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News : स्थापना काळापासून जिल्हा बँकेने नेहमीच आर्थिक शिस्त राखीत शेतकरी हिताचा कारभार केला आहे. पक्ष – पार्टीचा विचार बँकेत नाही. राजकीय विचार बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या जाणत्यांनी नेहमीच शेतकरी हिताचा आदर्श दाखविला आहे.

पूर्वसुरींच्या आदर्श आणि आर्थिक शिस्तीनुसारच बँकेचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे. असा निर्वाळा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिला. जिल्हा बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. ऐनवेळी विषय वाचन जेष्ठ संचालक सिताराम गायकर यांनी केले. कैलास बोर्डे, प्रा. भाऊसाहेब कचरे, रामराव शेटे, रणजीत बनकर, गोपाळघरे, पंडित गायकवाड, माधव दातीर लहू थोरात, माऊली हिरवे, प्रशांत दरेकर, अशोक कदम, रामदास झेंडे, अनिल आंधळे, संभाजी गुंजाळ, पोपट वाणी, अण्णासाहेब बाचकर, मारुती गलांडे, मुक्ताजी फटांगरे, दिनकर गर्जे, भीमराज हरदे, प्रवीण पराड, अरुण कडू, दत्तात्रय येवले यांनी विविध विषय सभेसमोर मांडले.

या दरम्यान सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी चेअरमन कर्डीले यांनी प्रत्येकास बोलू दिले जाईल. कोणासही अडविले जाणार नाही. मात्र, भाषणबाजी करू नका. मुद्याचे बोला. असे स्पष्ट केले.

अरुण कडू यांनी विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने तोटा झाकून ठेवल्याचा आरोप करीत तसे निवेदन दिले. यावेळी सभागृहातील काहीजणांनी ‘हि जिल्हा बँकेची सभा आहे. विखे कारखान्याची नाही.’ असे सांगत आक्षेप घेतला. त्यावर चेअरमन कर्डीले यांनी ‘अरुण कडू यांच्या मुद्याचे उत्तर जिल्हा बँक देईल. गोधळ करू नका.’ असे सांगीतले.

बँकेचे ज्येष्ठ संचालक भानुदास मुरकुटे म्हणाले, बँकेचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे. बँक प्रगतीकडे चालली आहे. व्हाइस चेअरमन माधवराव कानवडे म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कामधेनु आहे. सभेच्या सुरुवातीस बँकेचे तत्कालीन चेअरमन स्वर्गीय उदय शेळके तसेच अशोकराव भांगरे यांच्या प्रतीमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली

वन टाइम सेटलमेंट महत्त्वाचा निर्णय

अध्यक्ष कर्डिले यांनी बँकेच्या आर्थिक स्थिती आणि गतीचा आकडेवारीसह गोषवारा मांडत बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगितले. तसेच २०१५ पूर्वीच्या थकीत कर्जासंदर्भात वन टाइम सेटलमेंट चा निर्णय बँकेने घेतला त्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.

त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनेमुळे थकबाकीदार शेतकऱ्यांसह थकीत सोसायटी यांनाही उर्जित अवस्था मिळेल. जिल्ह्यातील जवळपास 300 संस्थांना वन टाइम सेटलमेंट च्या माध्यमातून बरखास्त तिच्या परिस्थितीतून बाहेर काढता येईल. मात्र त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.