जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज परत करावे…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेने ज्या शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसूल करताना व्याजाची रक्कमही घेतलेली आहे. ती त्या शेतकऱ्यांना तातडीने परत करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागू असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, सहकार आयुक्त यांचे दि.१४ मार्च रोजीच्या पत्रात परतावा व अनुदान रकमांची मागणी केवळ संगणकीय प्रणालद्वारा करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यासाठी नाबार्डकडील दि. ८ सप्टेबर २०२२ रोजीच्या परिपत्रकाद्वारे परिच्छेद क्रमांक चार व पाच बाबत शेतकऱ्यांची आधार जोडणी करण्याच्या सूचना दिल्या, परंतु अद्याप अनेक जिल्हा बँकांनी सन २०२१-२२ व २०२२-२३ कर्जाची माहिती त्याचप्रमाणे व्याज परतावा अनुदान रकमेची मागणी संगणकीय प्रणाली द्वारे सादर केली नसल्याचे बँकेच्या निदर्शनास आणून दिले व सदर माहिती एका आठवड्यात सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

परंतु सहकार आयुक्त यांनी बँकांनी सूचनाचे पालन न केल्याने पुन्हा दि.२७ मार्च रोजी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज न घेण्याच्या सूचनेबाबत स्मरण पत्र दिले परंतु तरीही बँकांनी शेतकऱ्यांकडून सेवा संस्थांमार्फत व्याज घेण्याचे सुरूच ठेवले.

आम्ही सदरची वरील बाब जिल्हा उपनिबंधक यांचे निदर्शनास निवेदन देऊन आणली परंतु आम्ही त्यांच्याकडे बँकेला तत्काळ पत्र वजा आदेश देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती . ती मागणी मान्य न केल्याने आम्ही त्यांच्या दारात ठिय्या आंदोलन केले,

त्यामुळे त्यांनी त्वरित बँकेला पत्र पाठवून शेतकऱ्यांकडून व्याज न घेण्याचे सहकार आयुक्त यांचे आदेशाचे अंमलबजावणी करण्याची सक्तीचे पत्र दिले. बँकेचे चेअरमन व संचालक मंडळांनी दि.४ मार्च रोजी कर्ज वसुली वसुली आढावा बैठकीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज न घेण्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्धही केली होती.

परंतु त्याच्या अंमलबजावणी बाबत कुठल्याही सूचना लेखी स्वरूपात बँकेला अथवा खाली देण्यात आलेले नव्हत्या त्यामुळे त्यानी उघड उघड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे दिसते. आम्ही केलेल्या आंदोलनामुळे जिल्हा सहकारी बँकेने सेवा संस्थांना व्याज न घेण्याच्या सूचना दिल्याचे आम्हाला सांगितले परंतु अद्याप पर्यंत सदरच्या सूचना सेवा संस्थांना मिळाल्या नाहीत अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत.

सदर सेवा संस्थांचे सचिव आमच्या ग्रुप वर तसे पत्र आले नाहीत अशी माहिती देत आहे. शिवाय बऱ्याचश्या शेतकऱ्यांनी व्याजासह कर्ज रक्कम भरलेली आहे, त्यांच्या व्याजाचे पैसे त्यांना परत मिळावेत ही आमची मागणी आहे.

जमा झालेले पैसे जिल्हा सहकारी बँकेने आपल्या नफा तोटा पत्रकात दाखवू नयेत व ज्या सेवा संस्थांचे व्याज बँकेने कपात करून घेतले असेल त्या सेवा संस्थांना ते त्वरित परत करावे अशी मागणी आम्ही करत आहोत.

आपण याची अंमलबजावणी न केल्यास आम्ही आपल्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार अथवा न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचा इशारा कार्ले यांनी दिला आहे. या पत्रकावर संदेश कार्ले यांच्या सह पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, संदीप गुंड, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांच्या सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe