जवळा : जामखेड तालुक्यातील चोंडी येथील प्रगतशील शेतकरी हरिभाऊ गणपत ढवळे यांच्या शेतीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेट देत, कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा थेट आढावा घेतला.
यावेळी कर्जत उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अशोक शेळके तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

हरिभाऊ ढवळे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अशा योजनांचा लाभ घेत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केला आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लकी ड्रॉद्वारे त्यांना या योजनांचा लाभ मिळाला.
यामुळे त्यांची शेती अधिक उत्पादक बनली असून, सिंचन आणि पाणीसंवर्धनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करत त्यांनी शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे.
डॉ. पंकज आशिया यांनी शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत, कृषी योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे सांगितले. “पाणीसंवर्धन, फलोत्पादन आणि आधुनिक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर केल्यास शाश्वत शेतीसाठी मोठा फायदा होईल. इतर शेतकऱ्यांनीही या योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय मदतीचा प्रभावी वापर केल्यास शेतकरी अधिक स्वयंपूर्ण होतील. असे कृषी अधिकारी यांनी सांगितले.
हरिभाऊ ढवळे यांसारख्या प्रगतशील शेतकऱ्यांमुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळत असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक शाश्वत आणि लाभदायक ठरू शकते.