अहिल्यानगर : रंगपचंमीच्या दिवशी मढी येथे सुमारे सात ते साडेसात लाख भाविकांनी चतुर्थ्यी व रंगपंचमी अशा दोन दिवसात (नाथभक्तांनी) कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मात्र वाहतुक कोंडी,खिसेकापुंचा व पाकीटमारांचा प्रचंड धुमाकुळ अशा अडचणी नेहमीप्रमाणे आल्या. त्यामुळे अनेक भाविकांना फटका बसला.
मढी ग्रामपंचायत व देवस्थान समितीने भाविकांना पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. मढी ही भटक्यांची पंढरी समजली जाते. पुर्वी जात पंचायतीमुळे मढी गावात राज्यातील अठरा पगड जातीच्या जात पंचायती व्हायच्या. आता त्यावर कायद्याने बंदी घातल्याने जात पंचायती बंद पडल्या आहेत. चतुर्थी व पंचमीच्या दिवशी राज्यभरातुन आलेल्या नाथभक्तांनी मढी गावात मोठी गर्दी केली होती.

देवस्थान समिती व मढी ग्रामपंचायत यांनी यावेळी अतिशय चांगले नियोजन केले. यात्रा समितीचेप्रमुख प्रांतअधिकारी प्रसाद मते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, तहसिलदार डॉ.उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रा काळात सजग भुमिका बजावली आहे. मढीत सुमारे सत्तर हजार अस्तान्या (काठ्या) आलेल्या होत्या.
भाविकांनी भर उन्हात देखील कानिफनाथ गड चढत नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनबारीच्या बाजुने व पुर्व दरवाजा आणि पश्चिम दरवाज्याजवळ गर्दी झाल्याने खिसेकापुंनी गर्दीचा फायदा घेत हात साफ केला. सुमारे पन्नास पेक्षा जास्त नाथभक्तांचे मोबाईल, पैसे लंपास केले.एका शेवगावच्या नाथभक्तांचे सहा तोळ्याचे सोन्याचे लाँकेट मढीच्या यात्रेत चोरीला गेले आहे.
राज्यभरातुन आलेल्या खिसेकापुंनी भाविकांना खुप त्रास दिला. गर्दीमुळे पोलिसांना देखील मर्यादा आल्या होत्या. वाहतुक कोंडीमुळे रस्ते गर्दीत झाकोळुन गेले होते. मढी ते धामणगाव रस्ता, मढी ते तिसगाव रस्ता व मढी ते निवडुंगा रस्ता या भागात वाहतुक कोंडी झालेली होती. तिसगाव व पाथर्डी शहरात देखील वाहतुक कोंडी झाली होती.
मढी पासुन ते मोहटादेवी पर्यंत आणि पाथर्डी ते शेवगाव व तिसगाव ते करंजी या मार्गात कायम वाहतुक कोंडी होत होती. नाशिक प्रादेशिक विभागातील पाचत जिल्ह्यातुन २५० बसगाड्या भाविकांच्या सोईसाठी सोडण्यात आल्या होत्या. मढी यात्रेचा होळीव आजचा दुसरा टप्पा रंगपंचमी पार पडला आहे. आता तिसरा टप्पा आमावस्य़ा व गुढीपाडवा हा बाकी आहे.
मढी ग्रामपंचायतीला यापुर्वी मिळणारा कररुपी महसुल यावर्षी चांगला झालेला दिसतो आहे. लाख भर वसुल मिळण्याची येथील जुनी पद्धत होती. यावर्षी पाच लाख रुपयापेक्षा अधिकचा करवसुलीचा विक्रम होताना पहावयास मिळत आहे. सरपंच व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय चांगले नियोजन करुन उत्पन्न मिळुन दिले आहे. यात्रेत राज्यभारातुन आलेल्या लहान मोठ्या व्यापा-यांना विविध सुविधा देण्याचे काम केले गेले.