Ahmednagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या ७ हजार सिंचन विहिरींच्या कामांतील अडथळ्यांविरोधात आमदार रोहित पवार यांनी नुकतीच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना त्यांनी आपण मंजूर करून आणलेल्या विकास कामात जाणीवपूर्वक, राजकीय द्वेषातून या कामांमध्ये सध्या अडथळे आणले जात आहेत. त्यांची चौकशी सुरु केली आहे. तरी या कामात अडथळे आणू नयेत अन्यथा जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकास कामाबाबत बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत शेतकरी आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन सुमारे ७ हजार सिंचन विहिरींची कामे मंजूर करुन आणली.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत अनुदानाच्या माध्यमातून २८० कोटी रुपये जमा होणार आहेत. परंतु राजकीय द्वेषातून या कामांमध्ये सध्या अडथळे आणले जात आहेत. त्यांची चौकशी सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी या तालुक्यात अधिकारी आणि कर्मचारी बदलून येण्यास तयार नव्हते.परंतु आपण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासाच्यादृष्टीने मतदारसंघात एक चांगले वातावरण निर्माण करून विकासामांनाही गती आली, असे पवार यांनी सांगितले.
कर्जत तालुक्यात ३ हजार सिंचन विहिरी, १२०० फळबागा, ४ हजार गायगोठे अशी वैयक्तिक लाभाची, तर ५८ प्राथमिक शाळांना संरक्षक भिंती, ३५० पाणंद रस्ते, वृक्षलागवड, राजीव गांधी भवन, पेव्हिंग ब्लॉक, सिमेंट रस्ते तसेच जामखेड तालुक्यातही जवळपास ४००० सिंचन विहिरी, ७६ शाळांना संरक्षक भिंती, ४ अंगणवाडी इमारती पूर्ण झाल्या. परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे, याकडे पवार यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.