हिवरे बाजार म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येत आदर्श गाव. आदर्शगाव समितीचे कार्यध्यक्ष पोपटराव पवार यांच्या प्रयत्नातून हे गाव जगाच्या नकाशावर चमकलं व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आता याच गावातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
त्याच झालं असं की, एक तरुण त्याच्या विचित्र अवतारामुळे अनेक गावात चोर समजून मार खात होता. व तो देखील गावोगाव फिरत होता. परंतु जेव्हा तो हिवरे बाजार मध्ये आला तेव्हा तरुणांमुळे त्याची कहाणी समोर आली. तो चोर नसून घरातून पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेला मुझफ्फरनगरचा मनोरुग्ण तरुण असल्याचे समोर आले.

तेथील तरुणांनी प्रयत्न करत स्थानिक केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधला. त्याचा पत्ता शोधून काढला व त्याचा भाऊ थेट मुजझफर नगर येथून त्याला न्यायला हिवरेबाजार येथे आला. व तरुणांच्या प्रयत्नामुळे चोर समजून अनेक गावात मार खाणाऱ्या तरुणाचा भरत मिलाप झाला.
अधिक माहिती अशी : सदर युवकाला २७ नोव्हेंबर रोजी काही लोकांनी चोर समजून पकडले. परंतु, त्याची त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांचा लक्षात आलं की हा चोर नसून घरचा रस्ता चुकलेला मनोरुग्ण आहे. तो त्याचे नाव जोगिंदर लचेडा असे सांगायचं. गावाचं नाव लघेडा असे त्याने सांगितले. त्यानंतर हिवरेबाजार येथिल प्रसन्न पोपटराव पवार यांनी इंटरनेटवरून त्याच्या गावाची , तेथील लोकप्रतिनिधींची माहिती घेतली. त्यानंतर तेथील स्थानिक खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी तेथून मदतीला सुरवात केली.
मंत्री संजीव बालियान यांनी मागोवा घेत मनोरुग्ण तरुणाचा भाऊ सतीश लचेडा याच्याशी सम्पर्क साधत माहिती दिली. तो लगेच आपल्या भावाला घ्यायला निघाला. २९ नोव्हेंबरला तो मुंबई-पुणेमार्गे हिवरेबाजारला रात्री पोहोचला. तेथेच दोघा भावांचा मिलाफ झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर दोघेही १ डिसेंबरला पुन्हा आपल्या घराकडे परतले. रेल्वे स्टेशनवरही २५ ते ३० तरुण त्यांना सोडण्यासाठी आले होते.
पाच महिन्यांपासून ‘तो’ फिरत होता, तिकडे त्याची आई अश्रू ढाळत होती
सदर मनोरूग्ण तरुण हा मागील पाच महिन्यांपासून भरकटलेला होता. घरापासून दूर आलेला होता. त्याच्या आईनेच त्यांच्या दोघांचा सांभाळ केलेला होता. त्यांचे वडील मृत पावले आहेत. परंतु जोगिंदर हा घरातून गायब झाल्याने त्याची आई दुखी होती. ५ महिन्यांपासून एकवेळचे जेवण तिने सोडले होते. परंतु आता हिवरेबाजारच्या तरुणांमुळे या सर्वांची भेट झाली आहे.