Ahmednagar News : खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील खेड घाटात रविवारी (दि. ६) आढळलेल्या बेवारस तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी छडा लावला असून, खेड पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या एका तरुणाला गुरुवारी (दि. १०) बेड्या ठोकल्या आहेत.
मयूर संदीप दळवी (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. आयटी अभियंता सौरभ नंदलाल पाटील (वय २३, रा. आकुर्डी, मूळ रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर) याचा खून करून त्याचा मृतदेह खेड घाटात फेकून दिला होता.
त्यानंतर रविवारी (दि. ६) कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला होता. गेल्या दिवाळीत कॉलेजमध्ये असताना खुन्नसने पाहिले म्हणून मयूर व सौरभ या दोघांत भांडणे झाली होती. स्थापत्य अभियंता असलेल्या मयूरने आयटी इंजिनीयर असलेल्या सौरभच्या गळ्यावर, पोटात चाकूचे वार करून डोक्यात दगड घालून ठार केले.
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरच्या खेड घाटात अर्थात सांडभोरवाडी गावच्या डोंगर परिसरात एक बेवारस कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह मिळुन आला होता. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पथके तयार करून तपास सुरु केला होता. आरोपी मयूर याने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र, मृताचे मूळ गाव कोपरगाव येथे शिक्षण घेताना तिथे घडलेल्या वादग्रस्त घटना पोलिसांना समजल्या. त्यानंतर पोलिसांनी थेट आरोपीला ताब्यात घेतले आणि खुनाचा उलगडा झाला.
मागच्या दिवाळीत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्राने मित्राचा काटा काढला. संशय येणार नाही अशा निवांत ठिकाणी, निसर्गाच्या सान्निध्यात बसून दोघांनी दारू प्यायली. त्यानंतर डोक्यात दगड घालून तसेच चाकूचे वार करून खून केला.