Ahmednagar News : अवैध वाळू उपसा व वाहतुकीतून वाढलेली गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी महसूल विभागाने ६०० रुपये ब्रास दराने वाळू विक्री करण्याचा निर्णय घेतला. १ मे पासून प्रायोगिक तत्त्वावर नगर जिल्ह्यातही ही वाळुविक्री सुरु झाली. याअंतर्गत अहमदनगर मधील ग्राहकांना ६०० रुपये ब्रास दराने वाळू सध्या दिली जात आहे.
मागील नऊ महिन्यात नगर जिल्ह्यातील १५ वाळू डेपोतून ५४ हजार ब्रासची वाळूची विक्री झाली असून यातून ३ कोटी ५० लाखांचा महसूल प्रशासनाला मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु सध्या मागणीनुसार प्रशासनाकडे मुबलक वाळू नसल्याने तब्बल १५ दिवस वेटिंग करावी लागत आहे.

नगर जिल्ह्यात कोठे आहेत वाळू डेपो
स्वस्त वाळूचा पहिला प्रयोग हा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नायगाव येथे केला गेला. नगर जिल्ह्यात पहिल्या टप्यात तीन वाळू डेपो सुरू करण्यात आले होते, आता ही संख्या १५ झाली. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, वांगी, एकलहरे, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर,
राहता तालुक्यातील पुणतांबा, दाढ, पाथरे, भगवतीपुर, संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कुंभारी येथे हे वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत. ग्राहकांचा या स्वस्त वाढू साठी चांगला प्रतिसाद मिळत असून,
या स्वस्त वाळूमुळे नदीपात्रातून चोरट्या मागनि होणारा वाळू उपसा थांबला आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात गुन्हेगारीला देखील आळा बसला आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
९७६ घरकुलांना मोफत वाळू
नगर जिल्ह्यात ६ हजार १८१ ग्राहकांना सहाशे रुपये ब्रास दराने वाळू देण्यात आली आहे. यामध्ये ९७६ घरकुलांना मोफत वाळू देण्यात आली असून, दैनंदिन १३० ग्राहक स्वस्त वाळू साठी ऑनलाईन नोंदणी करत असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकांचे हजारो रुपये वाचले
रात्रीच्या वेळी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून ती वाळू सहा हजार रुपये ब्रास दराने ग्राहकांना दिली जात होती. स्वस्त वाळूमुळे सरकारी दराने अधिकृतरित्या ग्राहकांना घरपोच वाळू मिळू लागल्याने लोकांचे अतिरिक्त ४ हजार ४०० रुपये वाचले आहेत.