२५ जानेवारी २०२५ राहुरी : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास चार जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले.ही घटना राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात दि. २० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मच्छिद्र गोरख पारखे (वय २५ वर्षे, रा. मांजरी ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ते मनोज बाचकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर अनिकेत अनिल पोळ यांच्याकडुन उचल घेउन त्यांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतात.
एक महिन्यापूर्वी मांजरी येथील ऋषिकेश भाउसाहेब भगत हा मच्छिद्र पारखे यांना म्हणाला होता की, तू मनोज बाचकर यांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणुन काम करु नको. मी त्यांचा ट्रॅक्टर पेटवून देणार आहे.त्यानंतर दि. २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मच्छिद्र पारखे हा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरुन वांजुळपोई येथुन अशोकनगर सहकारी साखर कारखान्याकडे जात होता.
तेव्हा मांजरी पाथरे शिव रस्त्यावर आरोपींनी त्याचा ट्रॅक्टर अडवला. आरोपींनी मच्छिद्र पारखे यांना लाथा- बुक्क्यांनी व ऊसाने मारहाण केली.तसेच ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतुन तो पेटवून दिला. तु आमचे नाव सांगीतले तर तुला पाहुन घेऊ,असा दम दिला.या घटनेत ट्रॅक्टर जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर मच्छिद्र गोरख पारखे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्या फिर्यादीवरून आरोपी ऋषीकेश भाउसाहेब भगत, संतोष आण्णा कायगुडे, बाबुराव गोधाजी विटनोर (तिघेही रा. मांजरी, ता. राहुरी) तसेच एक अनोळखी इसम अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. ३९/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १२६ (२), ३(५), ३२६ (एफ), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.