हरिश्चंद्र गडावरील ‘त्या’ तरुणाचा ड्रोनच्या साह्याने शोध ; मात्र अद्यापही ….

Published on -

Ahmednagar News : पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावले हरिश्चंद्र गड, कळसूबाई शिखरासह पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा धरणाच्या दिशेने वळू लागली आहेत मात्र, काही अतीउत्साही पर्यटक बेफिकीरीमुळे स्वतःचा जीव गमावत आहेत.

तीन चार दिवसापूर्वी भंडारदरा धरणात शिर्डी येथील एका तरुण पर्यटकाचा बुडून मुत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कळसूबाई शिखरावर चढाई करताना गुजरातच्या नौमीन नरेशभाई पटेल या २५ वर्षीय तरुण पर्यटकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हरिश्चंद्रगडावर गेल्या दोन दिवसांपासून एक पर्यटक या भागात अजुनही बेपत्ता आहे. अशा दुर्घटनामुळे पुन्हा येथील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान या तरुणाचा राजूर पोलिसांनी धान पथकाच्या मदतीने हरिश्चंद्रगड परिसरात त्याचा शोध घेतला. तसेच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या साह्याने हरिचंद्र गड परिसरात बेपत्ता तरुणाचा शोध घेतला, परंतु अद्याप बेपत्ता तरुण मिळाला नाही.

पावसाचे आगार व महाराष्ट्रातील सर्वात उच कळसूबाई शिखरासह हरिश्चंद्रगड व भंडारदरा धरण पर्यटनस्थळावर पावसाळ्यात खुललेल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले येथे वळतात.

पावसाळ्यात सह्याद्री रांगांमध्ये अल्हाददायी वातावरण असते, मात्र या भागात पावसात पर्यटन करणे धोकादायक झाले आहे. कारण सह्याद्रीतील वाटा पावसामुळे निसरड्या होतात. दाट धुके व वाढलेल्या गवतामुळे वाटा हरवतात. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात ओढे, नाले, धबधब्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेले असते.

कधी ढगफुटीसदृश्य पावसाने या परिसरात ओढे व नद्या वाहतात. यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हरिचंद्र गड व कळसुबाई शिखर, भंडारदरा धरण, रंधा धबधबा परिसरात पावसाळी पर्यटनाला बहर आलेला असतो, मात्र निसर्गाचा आनंद लुटताना पर्यटकांनी जिवाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

चार दिवसांपूर्वी शिर्डीच्या सद्दाम शेख या तरुण पर्यटकांचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना ताजी कळसूबाई शिखरावर चढाई करताना गुजरातच्या नौमीन नरेशभाई पटेल या तरुणाचा मृत्यू झाला होता. पुण्यातील रोहित साळुंखे (२०) हा तरुण १८ जून रोजी हरिश्चंद्रगड पाहण्यास आला होता, मात्र दुपारी ४ वाजेपासून तो बेपत्ता झाला आहे.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी सांदण दरीत दहिसरच्या ऐश्वर्या चारुदत्ता खानविलकर या २९ वर्षीय पर्यटक तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी हरिश्चंद्रगडावर पावसाळ्यात धुक्यात पुणे येथील ४-५ पर्यटक दोन दिवस रस्ता भरकटले होते. यामध्ये अनिल ऊर्फ बाळू नाथाराव गिते (३५, रा. जालना, ह. मु. कोहगाव, पुणे) यांचा थंडीने गारठून मृत्यू झाला होता. सध्या सांदण दरीत जाण्यास वन्य जीव विभागाने चार महिने बंदी घातली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News