१ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : आगामी काळात होत असलेल्या १० वी व १२ वीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्यात येईल. एवढेच नव्हे तर गैरप्रकारात सहभागी होणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावही पाठविला जाईल अशा कठोर सुचना जिल्हाधिकारी सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.
शुक्रवारी दक्षता समितीची बैठक पार पडली.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस निरीक्षक खेडकर आणि शिक्षण विभागाचे अधिकारी अशोक कडूस, भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, आकाश दरेकर, सुरेश ढवळे आदी उपस्थित होते.
मंगळवार दि.११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान १२ वी चे पेपर होतील व दि.२१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान १० वी चे पेपर होत आहेत.मात्र या काळात अनेक परीक्षा केंद्रावर गैरप्रकार केले जातात त्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांची आणि संस्थांची आठ दिवसात शाळेच्या परीसरात आणि वर्गात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून कार्यान्वीत करुन घेण्याची जबाबदारी राहील असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
उपलब्ध असणारे ड्रोन कॅमेरे परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण करणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवतील.जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र हे वेबकाकास्टींग जोडणी करुन त्यांचे मॉनिटरींग जिल्हा स्तरावरुन खास पथकामार्फत केले जाणार आहे.मोबाईल अँपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर होणाऱ्या हालचालींचे रेकॉर्डीग जतन करण्याची कार्यपध्दती अवलंबीली जाणार आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन बैठे पथकांचे नियोजन असणार आहे.परीक्षा केंद्रात गैरमार्गासाठी कोणतेही साहित्य जाणार नाही आणि केंद्राबाहेरील उपद्रवी घटकांवर निगराणीची जबाबदारी या दोन्ही बैठे पथकांवर असणार आहे.सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविला जाईल. सर्व तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी व इतर विभाग प्रमुख तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी देतील केंद्र स्तरावरही एक दक्षता पथक तयार करण्याचे आदेश आहेत.परीक्षा केंद्राच्या परीसरात कलम १४४ लागू केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना पोषक वातारवरणात व शांततेत परीक्षा देता यावी म्हणून प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या उपद्रवी घटकांचा बंदोबस्त केला जाईल.शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लागणे महत्वाचे आहे.- सिध्दाराम सालीमठ, जिल्हाधिकारी
गैरप्रकारापासुन परावृत्त करत विद्यार्थी अभ्यासाकडे वळला पाहिजे.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य राहील.भरारी पथकांची संख्या वाढवून परीक्षा केंद्रावरील बैठे पथक सक्षम केले केले जातील. जिल्ह्याची कॉपीमुक्त जिल्हा म्हणून नवी ओळख तयार होईल.यासाठी सर्व घटकांचे सकारात्मक योगदान महत्वाचे आहे – आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी