अवकाळीचा फटका वाळवणीच्या पदार्थांनाही

Published on -

Ahmednagar News : पावसाळ्याच्या आधी वाळवण, मसाले तयार करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांमध्ये लगबग सुरू आहे. एकीकडे महिलावर्ग यासाठी साहित्याची जमवाजमव करून विविध पदार्थ बनविण्यात व्यग्र आहे.

तर दुसरीकडे या वस्तूंना बाजार मागणी असल्याने बचतगटातर्फेही हे पदार्थ बाजारात विकण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने उन्हाळी पदार्थ बनवणाऱ्या महिला चिंतेत सापडल्या आहेत.

घरगुती मसाला तयार करण्यासाठी बाजारातून मिरच्या, दालचिनी, तमालपत्र, धणे, लवंग, बडीशेप, गुलाबफूल, काळीमिरी, दगडफूल, खोबरे, हळदकुंड या वस्तू खरेदी केल्या जात असून चवीनुसार त्याचा वापर कसा करता येईल, यावर भर देत आहेत.

हे सर्व साहित्य आणून ते अंगणात वाळत घालून त्यानंतर गिरणीत नेऊन वर्षभर पुरेल इतका मसाला तयार केला जात आहे. शहराबरोबर ग्रामीण भागांतील गावांत यासाठी महिला- पुरुषांची लगबग सुरू आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे आटोपले असल्याने पुरुष व महिला वर्ग मोकळा आहे.

त्यामुळे सामान आणून देणे, पदार्थ बनवताना मेहनतीचे काम पुरुष वर्ग करताना दिसत आहे. तर वाळवण, पीठ मळणे, पापड लाटणे हे काम महिला वर्ग करत आहे. शहरामध्ये नोकरदार वर्गाला सुट्टी असल्याने या सुट्टीचा उपयोग वर्षभराचा मसाला, पापड, लोणचे, कुरडया बनण्यासाठी नोकरदार महिला करताना दिसत आहेत.

मसाला दळण्यासाठी चक्कीत रांग लागत आहे. पहाटेपासून महिला या कामात व्यग्र असल्याचे चित्र आहे. पूर्वापार मसाले दुकानातून खरेदी करण्यापेक्षा ते घरीच तयार करून दळण्यासाठी गिरणीत नेले जातात. त्याचबरोबर कडाक्याच्या उन्हात अंगणात साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे वेफर्स, पिठाचे वडे,

पापड, लोणचे, शेवया, कुरडया तयार केल्या जात आहेत. बाजारात या तयार वस्तू मिळत असल्या तरी घरी चांगल्या प्रतीचे आणि आपल्या आवडीनुसार पदार्थ तयार करण्यावर महिलांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे.

घराच्या अंगणात लावण्यात आलेल्या झाडांचे आंबे लोणच्यासाठी वापरले जातात किंवा बाजारातून कैऱ्या खरेदी करून लोणचे तयार केले जात आहे. घरीच पदार्थ तयार केले जात असल्याने त्याची चव आणि दर्जा उत्तम राहतो, असे गृहिणी श्रीकांत ओझा यांचे म्हणणे आहे.

बाजारात या पदार्थांना मागणी असल्याने महिला बचत गटांसह अन्य महिला कुरकुरीत करड्या, पापड, शेवया, लोणची, मरंबे, साबुदाणा, नाचणी, गहू, ज्वारी, उडीद आणि पापड तयार करून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. घरगुती चव देणाऱ्या लघुउद्योजकांकडून, बचतगटांकडून कुरडया, पापड, चकल्या, शेवया आदी वस्तू विकत घेतल्या जात आहेत.

परंतु ग्रामीण भागापेक्षा शहरी व निमशहरी भागात या वस्तूंना मागणी आहे. उन्हाळी पदार्थ करण्याची लगबग गेल्या महिनाभरापासून महिला वर्गाची सुरू आहे. आता हे पदार्थ बनविण्याचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. साधारणतः २५ मे च्या पुढे पाऊस येतो.

या बेताने महिलावर्ग हे पदार्थ बनविण्याची नियोजन करत असतात, परंतु यंदा अवकाळी पाऊस कोसळत असल्याने वाळवणीचे पदार्थ बनविण्याच्या महिलांच्या कामाला फटका बसला आहे. गेले तीन दिवस सूर्यदर्शन नसल्याने पदार्थ वाळविण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कालपासून पुन्हा सूर्य दर्शन झाल्याने महिलांनी लगबगिने उन्हाळी पदार्थ बनविण्याची काम पूर्ण सुरू केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News