Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये वाढत असलेल्या चिलापी माशांमुळे इतर माशांवर गंडातर आले असून गावरान माशांना भंडारदरा धरण मुकले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या मच्छिमारी व्यवसायाला खिळ बसली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये पांढरा, कोंबडा, फिनिश, वाम, मरळ, ओंबळी, अशा प्रकारचे गावरान मासे मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र चार-पाच वर्षापूर्वी कुणीतरी अज्ञात इसमाने मत्स्य उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने चिलापी या माशांचे बिज भंडारदरा धरणात सोडले.

मुळातच चिलापी हा मासा दक्षिण आफ्रिकेतील असून सर्वात जास्त झिब्बांबे, मोझांबिक या देशामध्ये जास्त प्रमाणात आहे. तिलापिया या मुळ नावावरुन त्याचे चिलापी हे नाव पडले.
कोणत्याही पाण्यात तग धरुन राहण्याची क्षमता या माशामध्ये आहे. पाण्याच्या गढुळ व खोलगट भागामध्ये हा मासा आपली अंडी घालतो. धोक्याचा इशारा दिसताच तात्काळ आपल्या पिलासह बिज तोंडात घेऊन तो त्यांचे रक्षण करतो.
पाण्यामध्ये या माशाला भक्ष न भेटल्यास तो इतर माशांचा बिजावरही ताव मारतो. तो स्वतः आपल्या बिजांचे संरक्षण करत असल्याने मोठ्या प्रमाणात या माशाचे उत्पादन होते. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम हा मासा उजणी धरणामध्ये आढळुन आला. आता मात्र हा मासा सर्व धरणांमध्ये राज्य करत आहे. एकुण ९० देशांमध्ये हा मासा आढळुन येत आहे.
भंडारदरा धरणामध्ये चिलापी माशाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन दिसून येत असून गावरान माशाला मात्र हे धरण आता मुकले असल्याचे संकेत मिळत आहेत. याशिवाय हा मासा जास्त प्रमाणात खाल्ल्यास मानवी आरोग्यावरही याचा परिणाम दिसून येत असल्याने जगातील बहुतेक राष्ट्रांनी मांगुर माशांप्रमाणेच याही माशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
भंडारदरा धरणामध्ये स्थानिक आदिवासी तरुण मच्छिमारीचा व्यवसाय करुन स्वतःची उपजिविका भागवितात. तसेच बाहेरुन येणारा पर्यटकही भंडारदरा धरणाच्या गोड्या पाण्यातील माशाला मोठ्या प्रमाणात पसंती देत असतो.
परंतु भंडारदरा धरणात गावरान मासा सापडत नसल्याकारणाने आदिवासी बांधवांच्या रोजंदारीवर याचा विपरीत परिणाम, झाला असून स्थानिक मच्छि विक्रेत्यांनाही भंडारदरा धरणाच्या नावाखाली थेट हैद्राबाद येथुन मासे खरेदी करुन विक्री करण्याची वेळ आली आहे.
चिलापी या माशांच्या विक्रीवर भंडारदरा परिसरात बंदी घालुन स्थानिक गावरान माशांचे उत्पादन वाढविण्याची मागणी मच्छिमार दिनकर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.