अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- कार्यक्षेत्रातील उसाच्या नोंदी न करता इतर साखर कारखान्याकडून उसाची खरेदी करून गळीत हंगाम सुरू झालेल्या डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप सभासद अमृत धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
धुमाळ म्हणाले, कार्यक्षेत्रात लाखो टन गळिताचे उदिष्ट पूर्ण करणारा वैभवशाली साखर कारखाना ही तनपुरे सहकारी साखर कारखान्याची एकेकाळी संपूर्ण राज्यात ओळख होती. मात्र, चुकीच्या कारभारामुळे या साखर कारखान्याचे वैभव रसातळाला गेले.
ऊस उत्पादक सभासदांना विश्वासात न घेता सत्तेवर येणाऱ्या मंडळीने गैरकारभार करून साखर कारखाना मोडीत काढण्याचे काम केले. यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या क्रासिंग लायसन्सची साखर संचालक व साखर आयुक्त यांची परवानगी घेतली गेली नाही.
याबाबत साखर संचालकांनी लेखी पत्र दिले. मात्र विना परवानगी उसाचे गाळप सुरू असल्याने एक टन उसामागे ५०० रुपये दंडाची आकारणी झाल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण?
असा सवाल धुमाळ यांनी केला. मुळा व भंडारदरा धरणाचे वरदान असलेल्या राहुरी तालुक्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र मोठे आहे.
भौगोलिक परस्थिती चांगली असताना सहकारी साखर कारखाना बंद पाडून भावी पिढीचे प्रपंच उद््ध्वस्त करण्याचा प्रकार तनपुरे कारखान्यात सुरू असल्याचे धुमाळ यांनी म्हटले. यावेळी शेतकरी मंडळाचे अरुण कडू, नामदेव कुसमुडे, पंढरीनाथ पवार, अशोक ढोकणे, दादासाहेब पवार उपस्थित होते.
मर्जीतील संचालकांना विश्वासात घेऊन डाॅ. तनपुरे कारखान्याचा मद्यार्क परवाना भाडेतत्वावर चालवण्याचा डाव सभासदांनी आक्षेप घेऊन कार्यवाही हाणून पाडला.
तसेच साखर कारखाना जमिनीवर कर्ज अथवा जमिनीची विक्री केली जावू नये, यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हरकत घेण्यात आली आहे, असेही धसाळ यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम