जनतेच्या संघर्षामुळे निळवंडेच्या उजव्या कालव्याला पाणी- आ.तनपुरे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे राहुरी तालुक्यात पोहोचले. त्याबद्दल ठिकठिकाणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे औक्षण करण्यात येऊन गुलाल उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले.

लोकांनी केलेला संघर्ष व अनेकांचे योगदान आज फळाला आले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

निळवंडे धरणाचे पाणी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राहुरी तालुक्यात दाखल झाले. याबद्दल आमदार तनपुरे यांचा ठिकठिकाणी सन्मान करण्यात आला. त्यांनी निंभेरे आणि तुळापूर या गावांत जाऊन जलपूजन केले. यावेळी आमदार तनपुरे बोलत होते.

ते म्हणाले, अनेक पिढ्‌यांच्या प्रतीक्षेअंती निळवंडे धरणाचे पाणी राहुरी तालुक्यात वाहू लागले. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी अनेक लोकांनी केलेला संघर्ष, अनेकांचे योगदान आज फळास आले.

महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही मोलाची भूमिका बजावली. कोरोनाचा कठीण कालखंड असतानादेखील त्यांनी निधी कमी पडू दिला नाही.

भाजपा सरकारने पाच वर्षात मिळून जितका निधी दिला, तितका निधी महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक वर्षी दिला. त्यामुळे कालव्यांच्या कामाला गती आली.

राहुरी मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण वन विभाग आणि जलसंपदा विभागाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

कामातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. राहुरी तालुक्यातील उत्तर पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले असल्याचे आमदार तनपुरे म्हणाले.

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी दिवाळीच साजरी केली असून ठिकठिकाणी आमदार तनपुरे यांचे जोरदार स्वागत केले जात होते. काही ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

कृती समिती व माजी खा. तनपुरेंचे योगदान
निळवंडे पाटपाणी कृती समिती व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच ५४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राहुरी तालुक्यात अखेर निळवंड्याचे पाणी पोहचले.

त्यांनी विविध सरकारांवर आपला दबाव कायम ठेवला. रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई ते लढले. – आमदार प्राजक्त तनपुरे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe