अहिल्यानगर : मुळा कालव्यातून शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे कोलमडले आहे. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव, सामनगाव व मळेगावच्या टेलच्या भागातील शेतकऱ्यांचे भरणे बाकी असताना वरच्या भागातील मायनर उघडून टेलचे पाणी बंद करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली असताना पैसे भरूनही हेडच्या पाटबंधारे अधिकारी व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांची पाण्यासाठी विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने उन्हाळी कांदा, ऊस, भूईमूग, बाजरी व चारा पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थांकडे पैसे भरून मोठ्या प्रमाणात पाणी मागणी नोंदवली आहे. त्यानुसार संस्थांनीदेखील पाणी मागणी पाटबंधारे विभागाकडे नोंदवली आहे.

मात्र, नियमानुसार टेल टू हेड पद्धतीने संस्था व शेतकऱ्यांना पाणी मिळणे अपेक्षित असताना हेडच्या भागातील धनदांडगे शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कालव्याच्या क्षमतेएवढे पाणी खाली देत नाहीत. त्याचा परिणाम टेलच्या भागातील शेतकऱ्यांना आपसांत संघर्ष करावा लागत आहे.
शिवाय धरणात मुबलक पाणी असताना व पाणीपट्टी भरूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. उन्हाळी पिके जळून चालली असताना बळी तो कान पिळी,या प्रवृत्तीपुढे टेलचे शेतकरी हतबल झाले आहेत.मोठे क्षेत्र पाण्यापासून वंचित असताना अनेक भागातील मायनर उघडण्यात आले आहेत.
यामुळे संतप्त झालेल्या या भागातील शेतकऱ्यांनी याबाबत खासदार लंके यांच्याकडे आपले म्हणणे मांडले आहे. एकीकडे कांदा व ऊस दोन्ही पिकांना कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, उद्यापही पाणी मिळालेले नाही. मात्र दुसरीकडे धनदांडग्या शेतकऱ्यांना मात्र त्वरित पाणी मिळत असताना पाणी वापर संस्था व पाटबंधारे विभागाचे अधिकारी मनमानी पध्दतीने पाण्याची नासाडी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.