Ahmednagar News : शॉर्टसर्किटमुळे १४ एकर ऊस बेचिराख, शेतकरी रडकुंडीला

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे. महावितरणच्या तारा तुटल्यामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १४ एकर ऊस बेचिराख झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आधीच विविध संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. महावितरणने तातडीने रोख स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे हा प्रकार घडला आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील मनोज प्रभाकर चांदगुडे तीन एकर, निलेश प्रभाकर चांदगुडे तीन एकर, संजय प्रभाकर चांदगुडे ४० गुंठे, रवींद्र दत्तात्रय चांदगुडे ४० गुंठे, दीपक रवींद्र चांदगुडे दोन एकर, धनंजय प्रकाश चांदगुडे ६० गुंठे यांच्या शेतातील ऊस बेचिराख झाला आहे. महावितरणच्या तारा तुटल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या उसाचा पंचनामा झाला असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. कंपनीकडून मदत मिळून देऊ असे आश्वासन दिले असताना आधारकार्ड, उतारे आणि इलेक्ट्रिक बिल घेऊन गेले आहेत. यावरून ते नुकसान भरपाई इलेक्ट्रिक मागील थकीत बिलात जमा करणार असल्याचे दिसते. ९० टक्के शेतकऱ्यांची शेतीपंपाचे बिल लाखो रुपये थकलेले आहे.

या शेतकऱ्यांना जरी नुकसान भरपाई मिळाली ती त्या बिलात जमा होणार आहे. प्रत्यक्षात एकही रुपया मिळणार नाही. अगोदरच मेटाकुटीला आलेला व अस्मानी संकटांना तोंड देत सोसायटीचे कर्ज काढून पीक उभे केले. आता त्या सोसायटीच्या कर्जाची भरपाई कोण करणार?

कर्ज थकीत झाल्यास त्याची पतही राहणार नाही. उलट जमिनीवर बोजा पडेल. याची जबाबदारी कोण घेणार? तब्बल दहा-पंधरा एकर ऊस बेचिराख झाला. महावितरणने नुकसान भरपाई बिलात बजा न करता रोख स्वरूपात द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News