Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील अनेक मार्गावरील एस.टी. बसेस अचानक बंद केल्याने प्रवाशांना हाल आपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे.
शाळा, महाविद्यालय बंद असल्याच्या कारणाने प्रवासी मिळत नाही म्हणून बसेस बंद केल्याचे कारण सांगितले जाते. पारनेर आगाराच्या बसेस अतिशय जुन्या झाल्याने त्या वारंवार नादुरुस्त होतात, बसेसची संख्याही मागणीपेक्षा कमी आहे,
त्यामुळे वाहक व चालक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वरिष्ठांकडे मागणी करूनही नवीन बसेस व सुस्थितीतील बसेस पारनेर आगाराला उपलब्ध होत नाहीत. सध्या शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुझ्या लागल्याने विद्यार्थी बसेसने प्रवास करत नाहीत,
त्यामुळे बऱ्याच मार्गावरील बसेस रिकाम्या धावत होत्या. प्रवासी संख्या कमी असल्याने तोट्यात चालवाव्या लागतात. या कारणाने नगर – जवळा, वासुदे, कळस, विसापूर व इतर ठिकाणच्या रात्री मुक्कामी बसेस नाईलाजाने बंद कराव्या लागल्या आहेत, जूनमध्ये शाळा,
महाविद्यालये सुरु झाल्यानंतर या मुक्कामी व इतर बंद केलेल्या बसेस पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात येणार आहेत. परंतु बसेस अशा अचानक बंद केल्याने तसेच खासगी वाहनांची संख्या वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकही जवळपास बंद झाल्यात जमा असल्याने स्वतःचे वाहन नसलेल्या प्रवाशांना प्रचंड हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे.
सध्या सुरु असलेल्या यात्रा जत्रांचा हंगाम, धुमधडाक्यात सुरु असलेली लग्न सराई व सुगीचा हंगाम असलेला लोकसभा निवडणुका, त्यातच प्रचंड कडक उन्हाळा, हे सर्व एकत्रित आल्याने जीवाची घालमेल होत आहे, त्यामुळे दुचाकीवर प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. सर्वसामान्यांना एसटी बसेस शिवायपर्यायच नाही.