Ahilyanagar News: अहिल्यानगर- भविष्यात येऊ शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचलून ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी एक बैठक घेतली आणि सर्व तहसीलदारांना याची अंमलबजावणी तातडीने करण्यास सांगितले आहे.
तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी मिळणार
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते. अंत्योदय योजनेत सध्या ८७ हजार रेशनकार्डधारक असून, त्याद्वारे ३ लाख ८६ हजार लाभार्थी आहेत. तर, प्राधान्य कुटुंब योजनेत ६ लाख ३७ हजार रेशनकार्डधारक आणि २५ लाख ६३ हजार लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य मिळते, ज्यात २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू असतात. प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येक व्यक्तीला दरमहा ५ किलो धान्य मिळते, यात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ असतात. आता या लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी मिळणार आहे.

पुरवठा विभागाने अडचणीचा विचार करून वितरण करावे
पुरवठा विभागाने येत्या पावसाळ्याचा आणि संभाव्य पूर, प्रतिकूल हवामानामुळे धान्य वितरण आणि साठवणुकीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून जूनचे नियमित धान्य आणि जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांचे धान्य आगाऊ उचलण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ३० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तालुकास्तरावरील शासकीय गोदामांमध्ये पुरेशा प्रमाणात धान्य साठवण्यासाठी जागेची गरज आहे. जागा कमी पडल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाहतूक ठेकेदारांना २० दिवसांत तीन महिन्यांचे धान्य वाहतूक करण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कडक सूचनांमुळे यात कोणतीही चूक होता कामा नये, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
दररोज रेशन धान्य दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना
गोदामांमध्ये धान्य पोहोचल्यानंतर रेशन दुकानदारांनी तातडीने ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. रेशन दुकानदारांना दररोज दुकाने उघडी ठेवून लाभार्थ्यांना वेळेत तीन महिन्यांचे धान्य वाटप करण्याचे आदेश आहेत. यानुसार, लाभार्थ्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी मिळेल. पुरवठा विभागाने याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले आहेत.