Ahmednagar News : मागील काही दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकणी तर अजूनही शेतात पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत.
त्यातच भर म्हणून मुळा पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या कॅनलचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. उडीदाच्या पिकामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचले आहे. ते पाणी बंद न झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे उरले सुरले पीक देखील वाया जात आहे. त्यामुळे ‘आधीच होते थोडे त्यात व्याह्याने धाडले घोडे’ अशी अवस्था या परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पिके पाण्यात गेली आहेत. त्यात आणखी भर पडली ती मुळा धरणातून सोडलेले पाटाचे पाणी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीत पिकांना पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असल्याने पाण्याची गरज नसताना कुकाणा चारीव्दारे सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शहर टाकळी येथील शेतक-याचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगांवने परिसरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे पाण्यामुळे नुकसान होत आहे. त्यातच मुळा धरणातून पाटाला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद अदि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीके अति पाटपाण्यामुळे उपळुन चालले दिसून येत आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे अस्मानी संकट कपाशी, सोयाबीन, तुर, मूग, उडीद पिकांवर आले आहे. शेतकऱ्यांचे तुरी, कपाशीचे पीक ज्यादा पाण्यामुळे झाडे उन्मळून जात आहेत. तर सोयाबीन, मूग, उडीद जादा पाण्यामुळे सडत आहेत.
दरम्यान नदी-नाले भरून वाहत असल्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे. त्यातच मुळा धरणातून अतिरिक्त पाणी पाटाद्वारे सोडल्यामुळे शहरटाकळी, मजलेशहर, मठाचीवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात ते जात असल्याने शेतातील उभे पीकांचे होत असलेले मोठे नुकसान पाहता शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.