२१ जानेवारी २०२५ राहुरी खुर्द / आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर व त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हे दि. २० जानेवारी २०२५ रोजी सकाळी त्यांच्या दुचाकीवर नगरकडे जात असताना राहुरी खुर्द येथे एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.त्याचवेळी दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून गोकुळदास दातीर हे जागीच ठार झाले.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गोकुळदास कारभारी दातीर, वय ५० वर्षे, हे संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी, अजमपूर आणि आश्वी खुर्द येथील रहिवाशी होते. सकाळी दहा वाजता ते आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हे दुचाकीवर कामानिमित्त अहिल्यानगर जात होते.
राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी समोर त्यांची दुचाकी एका डंपरने धडकली, त्यानंतर एक दुहेरी ट्रेलर त्यांच्या जवळून गेले आणि गोकुळदास यांच्या डोक्याला गंभीर मार लागला,ज्यामुळे ते जागीच मृत्यूमुखी पडले.उत्कर्ष दातीर हा बालंबाल बचावला असून, त्याला किरकोळ जखमाही झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार ठोंबरे आणि रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुण राहुल पाटोळे, ओंकार खेवरे, भरत धोत्रे, राजूभाऊ खोजे, राम तोडमल, प्रदीप पवार, माणिक दराडे, सुभाष वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.
राहुरी खुर्द परिसरातील इरिगेशन कॉलनी समोर सदोष अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.