महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुकडीच्या पाण्याला सीना धरणच सापडले नाही ; आमदार राम शिंदे यांची टीका

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : राज्यात महायुती सरकार आल्याने सातत्याने तीनवेळा कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आल्याचे सांगत आमदार राम शिंदे यांनी आ.पवार यांचे नाव न घेता काही लोकप्रतिनिधींनी भोसा खिंड बोगद्यातून पाणी आपणच सोडल्याचे बातम्या दिल्या.

त्यांचे हे वक्तव्य म्हणजे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार असल्याने धांदात खोटं असुन सीना धरणात सोडण्यात आलेल्या कुकडी ओव्हरफ्लो पाण्याचे श्रेय महायुती सरकारचे असल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुकडीच्या पाण्याला सीना धरण सापडले नाही. अशी टीका आमदार राम शिंदे यांनी केली.

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणात कुकडीचे ओव्हरफ्लोचे व पावसाचे पाणी आले आहे. सिना धरण ओव्हरफ्लो झाल्याने सिनाच्या पाण्याचे आ.प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिना लाभक्षेत्रातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

आ. शिंदे म्हणाले, कुकडीमध्ये सीनाचा समावेश केल्यानंतर पहिल्यांदाच कुकडीचे पाणी ४५ दिवसांहून अधिक काळ सुरू राहिले. याचे सर्व श्रेय महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे असुन, मी या सरकारमधील आमदार असल्याने सरकारमधील मी दुवा आहे.

माझ्या प्रयत्नांमुळे योग्य दिशा दिल्याने अधिकाऱ्यांनी सूचना ऐकून पूर्ण दाबाने भोसा खिंड बोगद्यातून पाणी सोडले. हे श्रेय जलसंपदा विभाग व माझे देखील आहे. विरोधकांनी साडेतीन टीएमसी पाणी आल्याचे वृत्तात सांगितले.

धरणाची क्षमताच अडीच टीएमसी असल्याने साडेतीन टीएमसी पाणी गेले कुठे? असा खोचक सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर कॅनलचे अस्तरीकरण ही काळाची गरज असून संपूर्ण अस्तरीकरणासाठी शासन लवकरच निर्णय घेईल. अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. सीना धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्याने कर्जत, आष्टी, श्रीगोंदा, जामखेड या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe