अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली होती. राज्यभरातील नेत्यांनी त्यांना जोरदार प्रतित्युत्तरही दिले.
मात्र, त्यांच्याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र हे वक्तव्य चेष्टेवारी घेत जणू दुर्लक्षच केले आहे. ‘विखे चेष्टेनं असं बोलले असतील’, अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया पवार यांनी यावर दिली आहे.

जामखेडमधील एका कार्यक्रमानंतर आमदार पवार पत्रकारांशी संवाद साधला. विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस न बोलाविता जेवणासाठी आलेले वऱ्हाडी अशी टीका केली होती, यावर प्रति क्रियाविचारली असता पवार यांनी हे उत्तर दिलं.
भाजपच्या मिशन २०२४ नुसार नगर जिल्ह्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर पवार म्हणाले की याचा अर्थ जिल्ह्यातील भाजपचे नेते सक्षम नाहीत, असा होतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
अशा प्रकारांना आपला पाठिंबा नसेल मात्र माजी मंत्री राम शिंदे ज्यांचे समर्थन करीत आहेत, त्या पदाधिकाऱ्याची भाषणे त्यांनी तपासून पहावीत, असेही पवार म्हणाले.
मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यावरूनही त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. एकवेळ खासदार म्हणून सुजय विखे असा दावा करू शकतात, मात्र शिंदे यांनी या विषयावर बोलूच नये, असे पवार म्हणाले.