Ahmednagar News : श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या एन एच ५४८ या हायवेच्या दुतर्फा फुटपाथ, साईड गटर, बॅरिगेटिंग, लेंडी नाला पूल ही कामे सहा महिन्यात करतो असे खासदार विखे यांनी श्रीगोंदेच्या नागरिकांना आश्वासन दिले होते.
परंतु तब्बल दोन वर्ष उलटूनही या कामांसाठी विखेंकडून कोणताच पाठपुरावा झालेला नाही. तालुक्यातील अनेक अत्यावश्यक कामे बाकी असून खासदार मात्र साखर वाटपासारखे कार्यक्रम घेऊन शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम करत आहेत.
खोटे आश्वासन देऊन श्रीगोंदे मधील नागरिकांची फसवणूक केली आहे असा आरोप करत संभाजी ब्रिगेडने खासदार विखेंना काळे झेंडे दाखवले. मंगळवार (दि.१६ जानेवारी) रोजी श्री संत शेख महंमद महाराज मैदान येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमात खासदार सुजय विखे बोलत असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. खासदार विखे यांचे भाषण बंद पाडले.
जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, तालुकाध्यक्ष नाना शिंदे, सागर हिरडे आदी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कार्यक्रम स्थळी जाण्यापासून रोखले. तालुकाध्यक्ष इंजि.शाम जरे, तालुकाउपाध्यक्ष दिलीप लबडे व इतर काही कार्यकर्त्यांनी छुप्या मार्गांनी जात एकदम स्टेज च्या समोर जाऊन घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले.
यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाल्याचे दिसले. खासदार विखे यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले. पोलिसांनी कार्यक्रम संपेपर्यंत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेची धास्ती घेऊन खासदार विखेंना बाउन्सर घेऊन कार्यक्रमास याव लागले यावरूनच त्यांचे काम किती उत्तम सुरु आहे हे लक्षात येते. जनता याची अवती त्यांना देईल असे वक्तव्य शाम जरे यांनी केले.
जोपर्यंत खासदार विखे श्रीगोंदावासियांना दिलेला शब्द पाळत नाहीत तोपर्यंत तालुक्यात प्रत्येक कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड कडून विखेंचा निषेध करणार असल्याचं अरविंद कापसे यांनी यावेळी सांगितले.