शिक्षण आणि वाचनाने माणूस प्रगल्भ होतो ‘टग्या-टिगीच्या करामती’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक मांगडे यांचे मत

Mahesh Waghmare
Published:

अहिल्यानगर : शिक्षण आणि पुस्तकांचे वाचन यातूनच माणूस खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो. त्यासाठी प्रत्येक शाळेत आणि घरोघरी लहान मुलांना सहजपणे वाचता येतील अशा पद्धतीने पुस्तकांची उपलब्धता असावी असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाब मांगडे यांनी व्यक्त केले. लेखक ‘टग्या-टिगीच्या करामती’ या बालकथा संग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.

रुईखेल (ता. श्रीगोंदा) येथील शेळके वस्ती येथे आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मांगडे यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. बुधवारी (दि. 1 जानेवारी 2025) नवीन वर्षाच्या पहिल्या सायंकाळी हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम झाला.

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे मराठी विभागमधील प्रा. डॉ. महेबूब सय्यद हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर श्री क्षेत्र वाहिरा येथील संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह. भ. प. सिद्धीनाथ मेटे महाराज हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गवळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषीरंग प्रकाशनच्या संचालिका माधुरी चोभे यांनी केले.

यावेळी गेना शेळके, दत्तात्रय जगदाळे, संजय महांडुळे, दगडू महांडुळे, सुंदरदास नागवडे, शिक्षक विश्वनाथ महांडुळे, गोरख महांडुळे, उपसरपंच झुंबर महांडुळे, बापूराव भोस, राजेंद्र भोस, सुनील झगडे, संतोष बरस्कार, कैलास गव्हाणे, कवि डॉ. सूर्यकांत वरकड, पत्रकार सुनील चोभे, अविनाश निमसे आदि उपस्थित होते. डॉ. सय्यद म्हणाले की, विद्यार्थी जीवनात शैक्षणिक अभ्यासक्रमासह अवांतर वाचन करण्याची गोडी असावी.

त्यानेच भोवताल आणि जगातील सर्वांगीण माहितीचे आकलन होते. ‘टग्या-टिगीच्या करामती’ हे पुस्तक अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणारे आहे. तर, मेटे महाराज म्हणाले की, मोबाइलच्या काळात आता मुलांना वाचण्यासाठी नवीन आणि आताच्या जगाची माहिती देणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे.

हा बालकथासंग्रह त्यालाच चालना देणारा आहे. लेखक सचिन चोभे यांनी सांगितले की, आता आपण कितीही मोठे घर बांधत असलो तरीही घरात वाचन कोपरा विकसित करण्याचे विसरलो आहे. सक्षम भारत देश आणि सजग नागरिक घडवण्यासाठी अगोदर पालकांनी पुस्तकांचे वाचन करावे आणि आपल्या मुलांनाही पुस्तकाची गोडी लागेल

यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत ये हेतुनेच बालसाहित्यात लेखन सुरू केले आहे. शिक्षक आणि पालकांनी मिळून आता यासाठी मदत करण्याची गरज आहे. स्पर्धेच्या युगात याचेही खूप महत्त्व असणार आहे. त्यामुळेच पुढील वर्षभरात आणखी काही पुस्तके प्रसिद्ध केली जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe