जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण, आई अंगणवाडी सेविका, घरची परिस्थिती हलाखाची तरीही अहिल्यानगरच्या पठ्ठ्याचा यूपीएससीमध्ये डंका, जिल्ह्यातून चार जणांची निवड!

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौरव ढाकणे, ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्वर मुखेकर आणि अभिजित आहेर यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले. अंगणवाडी सेविकेचा मुलगा व दुष्काळी भागातील शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी होणार असून जिल्ह्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांनी नवे आदर्श निर्माण केले आहेत.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सप्टेंबर २०२४ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले, त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील चार तरुणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका अंगणवाडी सेविकेच्या मुलाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली, तर पाथर्डीच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील तरुणानेही या परीक्षेत यश मिळवले.

सप्टेंबर २०२४ मध्ये लेखी परीक्षा झाली, तर जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. यंदा जिल्ह्यातून चार उमेदवारांची निवड झाली आहे. यशस्वी उमेदवारांपैकी अनेकांनी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण पूर्ण केले आहे, तर दोघांनी अभियांत्रिकी शिक्षणानंतर यूपीएससीचा मार्ग निवडला.

आई अंगणवाडी सेविका

नगर तालुक्यातील निंबळक येथील ओंकार राजेंद्र खुंटाळे याने ६७३ व्या क्रमांकासह यूपीएससीत यश मिळवले. ओंकारची आई मीनाक्षी खुंटाळे अंगणवाडी सेविका असून, वडील राजेंद्र खुंटाळे देहरे येथील विकास सेवा सोसायटीत सचिव आहेत. लहानपणी ओंकार आईच्या अंगणवाडीत जायचा. त्याने चौथीपर्यंत निंबळकच्या जिल्हा परिषद शाळेत, तर पाचवी ते दहावी मारुतराव घुले पाटील विद्यालयात शिक्षण घेतले. न्यू आर्ट्स महाविद्यालयातून बीएससी पूर्ण केल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षांचे आकर्षण निर्माण झाले. पुण्यात यूपीएससीचा अभ्यास करताना त्याने एमएस्सीची पदव्युत्तर पदवीही मिळवली. पाचव्या प्रयत्नात त्याने यूपीएससी यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले. गावात त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वर मुखेकर यांची मेहनत फळाला

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील ज्ञानेश्वर बबन मुखेकर याने ७०७ व्या क्रमांकासह यूपीएससीत यश मिळवले. दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या ज्ञानेश्वरचे सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. यापूर्वी त्याने दोनदा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, ज्यामुळे त्याला चांगली पदे मिळू शकली असती. मात्र, जिद्दीने त्याने यूपीएससीसाठी अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर यश मिळवले.

सौरव ढाकणे यांचा प्रेरणादायी प्रवास

पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील सौरव राजेंद्र ढाकणे याने ६२८ व्या क्रमांकासह यूपीएससीत यश संपादन केले. त्याचे वडील राजेंद्र ढाकणे निवृत्त शिक्षक, तर आई गृहिणी आहे. सौरवने शेवगावच्या शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, तर काकडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबईतून सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्याने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि हे यश मिळवले.

अभिजित आहेर यांचा पाचव्या प्रयत्नात विजय

पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील अभिजित सहदेव आहेर याने ७३४ व्या क्रमांकासह यूपीएससी परीक्षा पाचव्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. अभिजितचे वडील सहदेव आहेर निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य, तर आई प्रा. विजया ढवळे-आहेर पारनेर महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अभिजितने बारावीपर्यंतचे शिक्षण पारनेरमध्येच पूर्ण केले. सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्याने यूपीएससीसाठी तयारी सुरू केली. सुरुवातीला अपयश आले, पण आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्याने पाचव्या प्रयत्नात यश मिळवले.

जिल्ह्यातून विद्यार्थ्यांची यूपीएससीसाठी तयारी

जिल्ह्यातील अनेक तरुण यूपीएससीसाठी तयारी करतात. यशस्वी उमेदवारांची संख्या वाढत आहे. मात्र, महापालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र बंद असल्याने अनेकजण पुणे, दिल्ली येथे जाऊन अभ्यास करतात. यापूर्वी नगर जिल्ह्यातील पूजा खेडकरनेही यूपीएससी उत्तीर्ण केली होती, परंतु तिची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती.

या चारही तरुणांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News