ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार मिळण्यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर शासन अधिक भर देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे भुमीपुजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संवत्सर कान्हेगांव- वारी या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास आमदार आशुतोष काळे,महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची नवीन प्रतिमा तयार होत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मंत्र बलशाली भारताच्या विकासाचे सुत्र बनले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन सामान्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीसह शेतकरी सुखी व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाला शासनाचे प्राधान्य आहे. केवळ एक रुपयांमध्ये पीकविमा उपलब्ध करून देणारे देशातील एकमेव असे आपले महाराष्ट्र राज्य आहे. कोपरगाव तालुक्यातील 52 हजार शेतकऱ्यांना या विमा योजनेचा लाभ देण्यात येऊन निधी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
पारंपरिक शेतपिकाच्या उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरण्याची गरज आहे. शेतीला उपयुक्त असलेले शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
शेतीमहामंडळाची असलेली जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये येणाऱ्या उद्योगामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असून बेरोजगार युवकांच्या हाताला त्यांच्याच भागात काम मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितले.
कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पशुसंवर्धन विभागामार्फतच्या योजनेअंतर्गत गायगटच्या धनादेशाचे तसेच दिव्यांगांना सहायक साधनांचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल तसेच औद्योगिक वसाहत मंजूर केल्याबद्दल नागरिकांच्यावतीने पालकमंत्री श्री विखे पाटील यांचा भव्य सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.