करंजी, तिसगावमधील अतिक्रमणे हटवली

Published on -

५ फेब्रुवारी २०२५ करंजी : करंजी ते भोसे रोडवरील अतिक्रमणे मंगळवारी आठवडे बाजारच्या दिवशीच हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ झाली; परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच स्वतः अतिक्रमण काढून घेतल्याने अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी भोसे रोडवरील दुतर्फा बाजूने मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी हटवण्यात आले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यावसायिकांनीच समजूतदारपणाची भूमिका घेतल्याने कुठल्याही प्रकारचा वाद विवाद न होता सर्व व्यावसायकांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतः अतिक्रमण काढून घेतले.

राहिलेल्या थोड्याफार व्यावसायिकांचे अतिक्रमण प्रशासनाने हटवले. करंजी येथील राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानक परिसरात देखील हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. काही व्यावसायिकांचे वाहतुकीला अडथळा येणारे फलक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अतिक्रम हटाव पथकाने काढून टाकले.

तिसगाव येथे देखील राष्ट्रीय महामार्गावर वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रोडपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने साईड गटारापर्यंत असलेली
सिफ्ट हाऊस अतिक्रमणे काढून टाकली. तिसगावमधील बहुतांश व्यावसायिकांनी दोन दिवसांपूर्वीच आपापले अतिक्रमण काढून घेतले होते. एकंदरीत करंजी, तिसगाव या ठिकाणी व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्यामुळे प्रशासनाचा ताण काहीसा कमी झाला.

अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव बडे, शाखा अभियंता ए.ए. सय्यद व त्यांची संपूर्ण टीम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता लोभाजी गटमल, शाखा अभियंता अभयकुमार राखाडे व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट कारवाई

करंजी- भोसे रोड असा अथवा करंजी-तिसगाव राज्य मार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गावर व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये अन्यथा कोणतीही पूर्वकल्पना न देता संबंधित अतिक्रमणावर कारवाई केली जाईल.- वसंतराव बडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe