शालेय विद्यार्थ्यांसाठीची वाहने सुरक्षित असतील याची दक्षता घ्या – जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला

Published on -

अहिल्यानगर, दि.१९- शालेय विद्यार्थ्यांची ने – आण करणारी बस व वाहने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असतील याची संबंधित शाळेने दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा शालेय बस सुरक्षितता व जिल्हा प्रवासी समन्वय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आदी उपस्थित होते.

श्री. ओला म्हणाले, प्रत्येक शालेय बस व इतर वाहनांमध्ये सीसीटीव्हीची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. ६ वर्षांखालील मुलांची ने-आण करण्यासाठी बस, वाहनांमध्ये महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. बस, वाहनांमधील चालक, वाहक व सहायकांची पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी करुन घेण्यात यावी. शालेय बस व वाहनांवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक लावण्यात यावा. सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमितपणे घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

जिल्ह्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्याबरोबरच रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश राहील, अशी व्यवस्था करावी. बसस्थानक परिसरामध्ये बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाईच्यादृष्टीने पहारेकऱ्यांची संख्या अधिक वाढविण्यात यावी. तसेच बसस्थानक परिसरामध्ये अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईच्या सूचनाही श्री. ओला यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe