Ahmednagar News : लग्नाचा ट्रेंड काळानुसार बदलत आहे. लाखो रुपयांचा विनाकारण खर्च होत आहे. परंतु यातही एक आदर्श निर्माण व्हावा असा विवाह अहमदनगर मध्ये पार पडला. आईवडिलांनी मुलीच्या लग्नात दहा शाळांना एक हजार पुस्तके भेट दिली.
तर रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार केला. स्नेहल असे नवविवाहितेचे नाव असून तुकाराम अडसूळ व संजना चेमटे-अडसूळ असे तिच्या आईवडिलांचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील हे शिक्षक दांम्पत्य आहे. सध्या हा विवाह व त्यांनी राबवलेला उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे.
अडसूळ यांची मुलगी स्नेहलचे नुकताच लग्न समारंभ पार पडला. ग्रंथालयाची ही पुस्तके शिक्षण संचालक दिनकर टेमकर, राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे ग्रंथालयास वितरीत केली.
यावेळी छत्रपती संभाजीनगर डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे, माजी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
या लग्नामधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांना झाडांची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सुमारे एक हजार रोपे वाटप करण्यात आली. अडसूळ यांनी गावातील मंदिराच्या बांधकामासाठीही मदत दिली.
विवाहात राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार मोनिका राजळे आदींसह उपस्थितांनी कौतुक केले. लग्नससोहळ्याला डायटचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पत्रकार, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.