सर्वसामान्यांना मोफत पाच किलो साखर देऊन सर्वांची दिवाळी गोड करणार – खा. सुजय विखे पाटील

Published on -

Ahmednagar News : सभासदांना उच्चाकी भाव देतानाच दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांना मोफत पाच किलो साखर देऊन सर्वांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७४व्या गळित हंगामाच्या शुभारंभप्रसंगी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात खा. विखे पाटील म्हणाले, सर्वांना न्याय देण्याची भूमिका आपली राहिली आहे. मागील वर्षी उच्चांकी भाव दिला. यावर्षीचा भाव तीन हजार रुपये प्रतिटन अगोदरच जाहीर केला आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे केवळ आपल्या आशीर्वादाने आदर्श काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा आपल्यामुळेच यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतानाच ते पुढे म्हणाले, आज विरोधक टीका करतात; पण सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.

आरक्षण मिळावे ही मागणी आपलीदेखील आहे. यासाठी विखे पाटील परिवार जनतेसोबत असल्याचे स्पष्ट करून विरोधकांना योग्य वेळी त्यांच्या मैदानात उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

टिका करा पण ती करताना आपण काय केले, हे जनतेला सांगा, असा टोलाही त्यांनी लगवला. दिवाळीसाठी शिर्डी मतदारसंघातील सर्व रेशनकार्डधारकांना पाच किलो साखर मोफत देऊन त्यांची दिवाळी गोड करणार असून त्याचे वितरण ५ नोव्हेंबरपासून होणार असल्याचे सांगितले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी उस लागवडीसाठी सभासदांनी प्राधान्य द्यावे व गळीत हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. खर्डे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या समाचार घेत आम्ही पाणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो; पण आपले योगदान काय? असा सवाल उपस्थित केला.

मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील परिवार कायम सोबत आहे. आरक्षण मिळावे ही आपली मागणी आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रमही सत्काराविना करण्यात आला. चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. गावोगावी सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे खासदार डॉ. विखे पाटील यांनी जाहीर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News