श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा जमा करण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यास येथील श्रीराम मंदिरासमोरील डावखर चौकात एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याकडून जबर मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याबाबत एकमत झाले. मात्र गुन्हा नेमका कोणी दाखल करायचा यावरून भिजत घोंगडे पडल्याने दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नाही.
पालिकेच्या स्वच्छतेचा ठेका खासगी एजन्सीला देण्यात आला. या एजन्सीमार्फत सुमारे ३०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. शुक्रवारी दुपारी डावखर चौकात कचरा साचला असल्याबाबतची तक्रार एका नागरिकाने पालिकेत नोंदविली होती.
त्याची दखल घेत कामाची वेळ संपल्यानंतरही सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कचरा गाडी पाठविण्यात आली. या गाडीवर नीलेश विठ्ठल पवार (वय ३४) हे कर्मचारी होते. कचरा जमा केल्यानंतर निघाले असता एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याने त्यांना अडवत, रस्त्यावरील सर्व कचरा जमा कर, असे धमकावत गाडीची चावी काढून घेतली.
मी तक्रारीवरून कचरा नेण्यासाठी आलो, असून इतर कचरा उचलण्यासाठी उद्या सकाळी घंटा गाडी येईल, असे पवार म्हणाले असता, या गोष्टीचा राग आल्याने त्याने पवार यांना गाडीच्या बाहेर ओढत खाली पाडून बेदम मारहाण केली.
पवार सध्या कामगार रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आयुब सय्यद व खोब्रागडे यांची भेट घेतली. जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस जीवन सुरूडे यांनी याबाबत माहिती दिली.
पालिका प्रशासनाने कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मात्र, ज्याला मारहाण झाली. त्यांनी फिर्याद देणे गरजेचे आहे. नगरपालिका पूर्ण सहकारी करील. याबाबत नगरपालिका फिर्याद देऊ शकत नाही. किंवा सदर कर्मचारी ज्या खासगी एजन्सीमध्ये
काम करीत आहे, ती देखील तक्रार देऊ शकत नाही.