श्रीगोंदा तालुक्यात खळबळ; शिर आणि हात तोडलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

Published on -

श्रीगोंदा, १३ मार्च २०२५: श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील एका विहिरीत बुधवारी (१२ मार्च) सकाळच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे शीर, दोन्ही हात आणि एक पाय गायब असल्याचे दिसून आले असून, त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर तसेच बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह अंदाजे २० वर्षीय तरुणाचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दाणेवाडी येथील विठ्ठल दगडू मांडगे यांच्या मालकीच्या विहिरीत हा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह येथे टाकण्यात आला असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी व तपासासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दाणेवाडी येथीलच एक २० वर्षीय तरुण बेपत्ता झाला असून, तो शिरुर येथील सीटी बोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे समजते. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. मात्र, मृतदेहाला शीर नसल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe