मी माझा कामासाठी गावाकडे आलो होतो. तुम्ही माझ्या गावात आले आहात, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. योगायोगाने मी याच परिसरात होतो, मग तुमचे स्वागत करावे म्हणून आलो आहे.
गावाचा नागरिक म्हणून खासदार डॉ. सुजय विखे यांनी गावासाठी काहीतरी भरीव द्यावे, अशी मागणी करतो, असे सांगून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी खासदरा डॉ. सुजय विखे व आमदार मोनिकाताई राजळे यांचा व्यासपीठावर येऊन सत्कार केला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी खा. विखे व आ. राजळे यांचा कार्यक्रम अकोला येथे आयोजित करण्यात आला होता. शनिवारी अकोला गावात कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे व्यासपीठावर आले.
क्षणभर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. भाजपाचा कार्यक्रम व ढाकणे कार्यक्रमात कसे, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, अॅड. ढाकणे व्यासपीठावर येताच त्यांनी प्रथम खासदार डॉ. सुजय विखे यांचा सत्कार केला व नंतर आमदार मोनिकाताई राजळे यांचाही सत्कार केला.
त्यानंतर त्यांनी थेट ध्वनीक्षेपकाचा ताबा घेतला. मी याच भागात होतो. मला समजले, खासदार विखे आपल्या गावात आले आहेत. मग स्वागत करावे म्हणून मी येथे आलो. आमदार भगिनी नेहमीच गावात येतात. मात्र, विखे पहिल्यांदाच गावात आले, त्यांचे स्वागत करतो व ग्रामस्थ म्हणून गावासाठी विखे यांनी काहीतरी भरीव करावे, अशी मागणी ढाकणे यांनी करून ते निघून गेले. या वेळी सरपंच नारायण पालवे, ग्रामस्थ व भाजपाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर भाजपाचा पुढील कार्यक्रम पार पडला.
अॅड. प्रतापराव ढाकणे यांचा राजकीय संघर्ष सुरु आहे. मात्र, आपल्या गावात आलेला कोणताही अतिथी आपला पाहुणा आहे. असे औदार्य दाखवत ढाकणे यांनी विखे व राजळे यांचे केलेले स्वागत हा राजकीय क्षेत्रातील एक चांगला पांयडा समजला जावा.
राजकीय विचार वेगवेगळे असले तरी आपली अतिथी देवो भवो ही संस्कृती जपली जावी, असा संदेश अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी युवा पिढीला कृतीमधुन दिला आहे. मी अमूक पक्षाचा कार्यकर्ता आहे, असे ऊर फुटेपर्यंत सांगणाऱ्या कार्यकर्त्यांनी यातून थोडासा धडा घ्यावा, अशीच अपेक्षा सामान्य माणूस करीत आहे.