पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित ..! आ. राम शिदेंच्या मागणीची घेतली दखल

Published on -

Ahmednagar News : पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना अखेर निलंबित करण्यात आले. शासनाचे सहसचिव डॉ. सुधीर गायकवाड यांनी हा आदेश जारी केला.

देशमुख यांचे मुख्यालय अधीक्षक अभियंता कुकडी, सिंचन मंडळ पुणे हे राहील. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ फेब्रुवारी रोजी टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीत कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नास वस्तूस्थितीदर्शक माहिती अवगत करु शकले नाहीत.

म्हणूनच आ. राम शिंदे यांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तसे न केल्यास आ. शिंदे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. शिंदे यांच्या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे.

निमगाव गांगर्डा (ता. कर्जत) येथून आवर्तन सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी पाणी असूनही आवर्तन सोडण्यास विलंब केला व शेतकऱ्यांना वेठीस धरले.

हा प्रकार आ. शिंदे यांनी टंचाई बैठकीत निदर्शनास आणून दिला. या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशमुख यांच्यावर निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe