१८ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावातील हॉटेल संकेतवर गुंडांनी हल्ला केला त्या हल्ल्यातला मुख्य आरोपी असलेला सलमान पठाणवर यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद असून त्याला तडीपार करण्यात आले होते पण तरीसुद्धा तो तडीपार असूनसुद्धा गावात कसा काय फिरत होता? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अहिल्यानगर-पाथर्डी महामार्गावर करंजी गावातल्या हॉटेल संकेतवर शनिवारी (दि. १५) रात्री दहा वाजता गुंड सलमान पठाणच्या टोळीने हल्ला चढवला होता. त्या हल्ल्यात हॉटेलचे मालक राजेंद्र अकोलकर यांच्यासोबतच असलेले पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणातला मुख्य आरोपी सलमान पठाण याने यापूर्वी लोहसर मधील संदीप सुभाष गिते व त्यांचे बंधू देवेंद्र गिते हे कार्यक्रमावरून घरी परत येत होते तेव्हा त्यांना अडवले होते तेव्हा त्यांना धाक दाखवून त्यांच्या खिशातील ५८ हजार रुपये काढून फरार झाल्याची तक्रार पाथर्डी पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.तसेच ७ जून २०२४ रोजी करंजी घाटातून जात असताना मराठवाडा येथील फिर्यादीचे वाहन अडवून त्यांना त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून यांच्या जवळ असलेली सर्व रोकड आणि मोबाइल काढून घेतल्याचा गुन्हाही पोलिसात दाखल होता.
भोसे येथील साईनाथ गवराम पाटोळे याला त्याच्या घरी जाऊन त्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्यादही पाथर्डी पोलिसात दाखल झालेली आहे.त्या आरोपीवर अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.त्यामुळे त्याला बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरुर तालुक्यातून तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून तडीपार केल्याची नोटीस पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी बजावली होती.
या नोटिसमध्ये त्याला २५ जानेवारी २०२५ रोजी समक्ष म्हणणे मांडायला सांगितले होते. परंतु, त्याने आपले म्हणणेच मांडले नाही.म्हणजे तो तडीपारीचा निकाल कायम ठेवण्यात आला होता,तरीही तो गेल्या अनेक दिवसांपासून करंजी गावात त्याच्या आपल्या टोळीसोबत फिरत होता.
पोलिस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले नसते तर हा हल्ला झाला नसता. या गुन्ह्यातल्या फरार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी नाहीतर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुनील साखरे, आबासाहेब अकोलकर, विवेक मोरे, नवनाथ आरोळे, राहुल अकोलकर, राजेंद्र जबाजी अकोलकर, शेखर मोरे, बंडू अकोलकर, सुभाष अकोलकर, विकास अकोलकर, संतोष अकोलकरसह अनेकांनी दिला आहे.
करंजीतील हॉटेल संकेतवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी सलमान पठाण याच्या तडीपारीचा प्रस्ताव आहे. त्याच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीची चौकशी होऊन त्यावर निकाल देऊ. -प्रसाद मते, प्रांताधिकारी, पाथर्डी