२७ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेल्या कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. नोंदणीसाठी ज्या कुटुंबाकडे महिला काम करण्यासाठी जाते, तिला संबंधित कुटुंबाकडून प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. मात्र, शहरासह जिल्ह्यात असे प्रमाणपत्र देण्याची मानसिकता नसल्याने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी कमी होत आहे.
शहरासह ग्रामीण भागात घरेलू कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत कामगार कार्यालयाकडे नोंदणी करण्याचे प्रमाण कमी आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.परंतु, ज्यांच्याकडे महिला काम करतात ते कुटुंब प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात.
त्यामुळे कामगार कार्यालयात नोंदणी करण्याचे प्रमाण कमी आहे.प्रमाणपत्र दिल्यानंतर भविष्य निर्वाह निधी द्यावा लागतो तसेच नियमांप्रमाणे वेतन द्यावे लागते,असा गैरसमज आहे.त्यामुळे घरेलू कामगारांकडून मागणी करूनही प्रमाणपत्र दिले जात नाही हे प्रमाणपत्र केवळ पुराव्यासाठीच ग्राह्य धरले जाते,असे कामगार विभागाचे म्हणणे आहे.
नोंदणी कोठे, कशी करावी ?
अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करून दिली जाते.त्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बँकेचे पासबुक आणि कुटुंबाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत घरेलू कामगारांना मिळतात लाभ
कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम नोंदणी केल्यानंतर एकदाच मिळते. नोंदणीकृत घरेलू कामगारांना भांडे व इतर साहित्याची एक किट देण्यात येते. नोंदणीकृत घरेलू कामगारांचा अपघात विमा उतरविला जातो.शहरासह जिल्ह्यात घरेलू कामगारांनी मागील दोन वर्षात १३ हजार ३९ कामगारांनी नोंदणी केली होती. यापैकी केवळ २ हजार ७८ कामगारांची नूतनीकरण केले आहे.