Ahilyanagar News : संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारात बनावट नोटांची छपाई करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशानुसार पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत करण्यात आली.
गुप्तचर विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुंजाळवाडी परिसरातील एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याचा संशय आला होता. त्यामुळे पुणे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे प्रिंटर, विशेष प्रकारचे कागद आणि आधी छापलेल्या काही नकली नोटा जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत रजनीकांत राहणे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे बनावट नोटांच्या छपाईबाबत सखोल चौकशी केली जात आहे. या नोटा चलनात कशा वापरण्यात आल्या, त्यासाठी लागणारा कागद कुठून आणला गेला, या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.
ही कारवाई दिल्ली गुप्तचर विभागाच्या आदेशावरून पुणे गुप्तचर विभागाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने केली. या मोहिमेत गुप्तचर विभागाचे चार अधिकारी, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक समीर अभंग आणि पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे, राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
रजनीकांत राहणे याच्याकडे सखोल चौकशी केली जात असून, छापलेल्या नोटांचे कोणतेही नेटवर्क होते का, या बाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच, या बनावट नोटा बाजारात कुठे आणि कशा वापरण्यात आल्या, त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळवला जात होता, हे स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. या बनावट नोटांच्या व्यवहारात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास गुप्तचर विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे.