अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून वाचलेला मोजकाच शेतमाल बाजार समितीत दाखल होत आहे.
एक नंबर कांदा साडेसात हजारापर्यंत पोहोचला होता, परंतु शनिवारी वांबोरी उपबाजारात झालेल्या लिलावानुसार एक नंबर कांद्याला अवघा ५ हजार १०० ते ६ हजार ५०० प्रति क्विंटल दराने विकला गेला. आवक कमी असतानाही दर घसरल्याने शेतकऱयांमध्ये नाराजी आहे.
शनिवारी झालेल्या लिलावात ७ हजार ४१२ गोणी कांद्यापैकी ८१० गोणी कांद्याला प्रति क्विंटल ६ हजारांवर भाव मिळाला. तर २ हजार १९७ गोणीला ५ हजार ते ५ हजार ८००, ४ हजार १३२ गोणीला ५०० ते ४ हजार भाव तर अपवादात्मक ८१ गोणीला ७ हजार ५०० व १७२ गोणीला ७ हजारांचा भाव मिळाला.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात वाढ सुरू झाली. त्यावेळी एक नंबर कांदा १ हजार ७०० ते २ हजार २०० रूपयांनी विकला गेला होता. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत गेली. वांबोरी उपबाजारात १९ आॅक्टोबरला एक नंबर कांदा तब्बल ६ हजार २०० ते ७ हजार ५०० दराने विकला गेला.
त्यावेळी मोजक्या ११९ गोणी कांद्याला ९ हजारांचा भाव मिळाला होता. परंतु, मागील दोन दिवसांपासून कांद्याचे दर कमी झाले आहेत.
शुक्रवारी (२३ आॅक्टोबरला) राहुरीच्या बाजार समितीच्या मुख्य बाजारात २०,८७२ गोणी आवक झाली, एक नंबर कांद्याला ५ हजार ते ६,५०० दर मिळाला. शनिवारी झालेल्या वांबोरी उपबाजारात ७, ४१२ गोणी आवक होऊनही एक नंबर कांद्याला साडेसहा हजारापर्यंत भाव मिळाला. कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved