राहुरीच्या पूर्व भागात पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी आनंदित !

Ahmednagarlive24 office
Published:
sheti

सोमवारी दुपारी राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, त्याचप्रमाणे ऊस, मका, कांदा, सहित घासासारख्या चारा पिकांना देखील जीवदान मिळाले आहे.

या भागातील शेतकरी, कष्टकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर सोमवारी दुपारी सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्याची पुढील आठ ते पंधरा दिवस पिकांना पाणी देण्याची चिंता यामुळे मिटली आहे.

सोमवारी दुपारी वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी वळण, चंडकापूर, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, कोंढवड, शिलेगाव, महाडुक सेंटर, मुसळवाडी, टाकळीमियाँ परिसरात एक ते दीड तास हलक्या दमदार सरी बरसल्या.

ढगांचा गडगडाट नाही. की विजेचा कडकडाट नाही अगदी शांत हा पाऊस सर्व दूर झाल्याने पाण्यावर आलेल्या विशेषतः कपाशी, सोयाबीन, ऊस, मका, घास या पिकांना यामुळे चांगलेच जीवदान मिळाले. एक प्रकारे वेळेवरच पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता सध्या तरी काही अंशी दूर झाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे समाधानकारक दिसत आहेत.

सुरुवातीला वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यासह कष्टकरी, शेतमजूर आनंदला होता. पहिल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन या पिकांना प्राधान्य देत लागवड केली होती. उगवणही चांगली होऊन पिके वाढीला लागली असतानाच पावसाने ओढ दिल्याने पिके पाण्याच्या प्रतीक्षेत होती.

शेतकऱ्यांपुढे पिकाला पाणी कसे व कुठून द्यायचे? हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे प्रत्येक जण आतुरतेने पावसाची वाट पाहात होता. मागील आठवड्यात असाच भीजपाऊस अर्धा एक तास झाल्याने त्याही वेळेला शेतकऱ्यावर कोसळू पाहत असलेले संकट टळलं होतं.

आता दुसऱ्यांदा वेळेवरच पाऊस फार जोरदार नसला, पाणी वाहून जाणारा मोठा पाऊस झाला नसला, तरी जो भीज पाऊस व हलक्या सरी बरसल्या आहेत. तो पिकांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचे शेतकरी सांगत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe