सोनई: अहमदनगर जिल्ह्यातील सोनई परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावराने खळबळ उडाली आहे. कांगोणी रस्त्यावरील हनुमान वाडी शिवारात शनिवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येळवंडे वस्तीवर सकाळच्या वेळी शेतकऱ्यांना हा बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला. त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.
शेतकऱ्यांमध्ये दहशत
या परिसरात यापूर्वीही बिबट्याने बोकड, कुत्रे आणि शेळ्यांवर हल्ले केले होते. त्यामुळे शेतकरी आधीपासूनच चिंतेत होते. शनिवारी सकाळी जालिंदर येळवंडे हे शेतात जात असताना अवघ्या ३०० फूट अंतरावर बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी मोठ्या आवाजात इतर शेतकऱ्यांना सावध केले, त्यामुळे बिबट्या अचानक जवळच्या शेतात पळून गेला.

वीजपुरवठा दिवसा सुरू करण्याची मागणी
सोनई आणि आसपासच्या ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी थ्री-फेज वीजपुरवठा रात्रीच्या वेळी देते, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी मोटार चालवण्यासाठी शेतात जावे लागते. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कारवाई करण्याची मागणी
स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. मागील काही महिन्यांत बिबट्याने अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. भविष्यात मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रगतीशील शेतकरी जालिंदर येळवंडे यांनी वन विभाग आणि प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे शेतकरी, महिला आणि विद्यार्थी भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड होत असून, अनेकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळले आहे. प्रशासन आणि वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची, बिबट्याचा शोध घेण्याची आणि त्याला सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.













